बेळगावचे ‘ब्लड मॅन’ अथवा ‘मिशन मॅन’ म्हणून सुपरिचित असणारे फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख आणि फ्रीलान्स कार्पोरेट ट्रेनर संतोष दरेकर यांना येथे समाज सेवेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे येथील स्टार फेअर्स इव्हेंट्स संस्थेतर्फे प्रतिष्ठेच्या ‘द एक्स्ट्रा माईल अवॉर्ड् -2021’ या पुरस्काराने रविवारी सन्मानित करण्यात आले.
पुणे येथील स्टार फेअर्स इव्हेंट्सतर्फे काल रविवारी ‘द एक्स्ट्रा माईल अवॉर्ड्स -2021’ या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पल्लवी मोरे -माने यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यात प्रमुख पाहुणे मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या हस्ते उत्कृष्ट समाजसेवेसाठी असणारा ‘द एक्स्ट्रा माईल अवॉर्ड्स -2021’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी दरेकर यांच्यासमवेत त्यांचे मित्र आणि कार्यक्रमाचे पाहुणे प्रमोद शर्मा व्यासपीठावर उपस्थित होते. पुणे येथील हॉटेल लेमन ट्री प्रीमियर या ठिकाणी सदर पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
द एक्स्ट्रा माईल अवॉर्ड्स -2021 हा पुरस्कार प्राप्त करण्याबरोबरच बेळगावचा नावलौकिक पुणे -महाराष्ट्रपर्यंत पोचवल्याबद्दल संतोष दरेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. दरम्यान, आपल्या यशाचे श्रेय संतोष दरेकर यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह प्रसारमाध्यमांना ही दिले आहे.
प्रसार माध्यमांच्या सहकार्यामुळेच आपण गोरगरीब गरजू तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून समाजकार्य करू शकलो. आपण सर्वांनी मिळून चांगले समाज कार्य करूया आणि मानवतेचा संदेश जगभरात पोहोचवून आपल्या बेळगावचे नांव उज्वल करूया, अशी प्रतिक्रिया संतोष दरेकर यांनी व्यक्त केली आहे.