माईन्स ओनर्स अँड मिनरल्स ट्रेडर्स असोसिएशनतर्फे (मोमटा) शेतकऱ्यांच्या नापीक -ओसाड जमिनीतील निकृष्ट घटक बाजूला काढून शेतकऱ्यांना ती जमीन शेतीसाठी उपयुक्त करून देण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. येत्या सहा महिन्यात 50 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळवून देण्याची प्रतिज्ञा आम्ही केली आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष नितीन म्हाडगुत यांनी दिली.
बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. केंद्र सरकारने 2016 मध्ये ओसाड जमिनींचे शेतजमिनीमध्ये रुपांतर करण्याचा नियम केला आहे. कर्नाटकमध्ये सदर नियम 30 जून 2020 मध्ये लागू करण्यात आला.
माईन्स ओनर्स अँड मिनरल्स ट्रेडर्स असोसिएशन अर्थात मोमटाने येत्या 6 महिन्यात कर्नाटकातील 500 गावातील 2500 हेक्टर नापीक जमीन सुपीक पिकाऊ बनवण्याद्वारे 50 हजार शेतकऱ्यांना मदत करण्याची प्रतिज्ञा केली आहे.
शेतकऱ्यांच्या नापीक ओसाड जमिनींचे सुपीक जमिनीमध्ये रूपांतर करून देण्याबरोबरच शेतकऱ्यांना वीज, पाणी या सुविधाही पुरवण्यात येत आहेत. संबंधीत जमिनीतील निकृष्ट घटकांचे पुनर्वापरासाठी रिसायकलिंग केले जाते असे सांगून येत्या कांही महिन्यात मोरब, आमटे, बेटगिरी, बैलुर, बेळवट्टी या ठिकाणच्या टाकाऊ जमिनींचे शेतजमिनीत परिवर्तन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही, असेही नितीन म्हाडगुत यांनी स्पष्ट केले.
बडस इनाम येथील कल्लाप्पा पाटील या शेतकऱ्याने आपली 10 एकर नापिक जमीन अवघ्या दहा महिन्यात सुपीक बनविण्यात आली असून यंदापासून आपण त्या जमिनीत शेती सुरू केली असल्याचे यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेस असोसिएशनचे उपाध्यक्ष दस्तगीर वालीकर, सचिव दिलीप इंगळे, संचालक आकाश डुकरे, नदीम परवेज आदी उपस्थित होते.