…कोण म्हणतंय की समाज माध्यम अर्थात सोशल मीडियामध्ये बातमी आली तर त्याची दखल घेतली जात नाही? खुद्द खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी हा समज खोटा ठरवताना बेळगाव लाईव्हमधील वृत्ताची दखल घेऊन सन्नहोसूर (ता.खानापूर) येथील गरीब शेतकऱ्याला मदतीचा हात दिला आहे.
तोपीनकट्टी (ता. खानापूर) ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या सन्नहोसुर गावातील लक्ष्मी गल्ली येथे राहणाऱ्या ज्योतिबा विष्णू गुरव या गरीब शेतकऱ्याचे घर गेल्या दोन महिन्यापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोसळले आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत विकास अधिकार्यांकडे (पीडिओ) तक्रार करून देखील त्यांनी अद्याप गुरव यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे गरीब परिस्थिती असणाऱ्या ज्योतिबा गुरव यांना अद्याप आपल्या घराची व्यवस्थित डागडुजी करता आलेले नाही. परिणामी आपल्या लहान अपंग मुलांसमवेत यांना स्वतःचे घर असून देखील उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात खानापूरच्या आमदार याकडे लक्ष देतील का? या शीर्षकाखाली गेल्या 20 ऑक्टोबर रोजी बेळगाव लाईव्हने वृत्त प्रसिद्ध केले होते.
सदर वृत्ताची दखल खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी घेतली आहे. त्यांच्या आदेशावरून सर्कल तलाठ्यांनी सन्नहोसुर गावातील लक्ष्मी गल्ली तेथील ज्योतिबा गुरव यांच्या कोसळलेल्या घराला भेट देऊन पंचनामा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आमदार फंडातून गुरव यांना घर बांधण्यासाठी निधी मंजूर केला जाणार आहे.
*खानापूरच्या आमदार ‘या’कडे लक्ष देतील का?*