श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान बेळगाव शाखेच्यावतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी श्री दुर्गामाता दौड यंदा मोठ्या प्रमाणात साजरी केली जावी, अशी मागणी रविवारी पार पडलेल्या शिवप्रतिष्ठानच्या बैठकीमध्ये उपस्थित कार्यकर्त्यांनी केली. त्यानुसार दौडला परवानगी मिळवण्यासाठी शिवप्रतिष्ठानतर्फे प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यंदाच्या दुर्गामाता दौड आयोजनासंदर्भात शहरातील छत्रेवाडा येथे काल रविवारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान बेळगाव शाखेची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष किरण गावडे हे होते. यावेळी शहर अध्यक्ष अजित जाधव यांनी मागील बैठकीप्रमाणे भव्यतेत दौड काढण्याची कार्यकर्त्यांची मागणी कायम आहे. शहरातील लोकांची देखील हीच अपेक्षा आहे दौंडला परवानगी देण्याबाबत लवकरच पोलीस आयुक्त व इतर अधिकारी यांची भेट घेतली जाणार असल्याची माहिती दिली.
गेल्या 22 वर्षांपासून शहरात श्री दुर्गामाता दौड अखंडपणे काढली जात आहे. गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे साधेपणाने दौड काढण्यात आली होती. मात्र यावेळी परिस्थिती पूर्वपदावर आली असून अनेक व्यवहार सुरळीत सुरू आहेत. राष्ट्रीय पक्षांच्या सभाही मोठ्या प्रमाणात घेतल्या जात आहेत. अशा वेळी फक्त सण -उत्सवांवर निर्बंध का? असा प्रश्न कार्यकर्त्यांनी बैठकीत उपस्थित केला. त्यानुसार विविध गावांमध्येही दौंड काढली जावी. कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात जनजागृती करण्यावर भर द्यावा, अशी सूचना बैठकीत करण्यात आली.
बैठकीस शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, शहर प्रमुख अजित जाधव, विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, किरण बडवाण्णाचे, शंकरदादा भातकांडे, अशोक पाटील, बाळू गुरव, विठ्ठल सोमनाचे, विजय कुंटे, प्रमोद चौगुले, आनंद चौगुले, हिरामणी मुचंडीकर आदींसह सर्व विभाग प्रमुख व धारकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
दरम्यान, यंदाची दौंड नेहमीप्रमाणे भव्य प्रमाणात काढण्यासंदर्भात आज सकाळी आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांची भेट घेऊन आमची मागणी त्यांच्या समोर ठेवली आहे. आता यासंदर्भात आज सायंकाळी निर्णय होण्याची शक्यता आहे, असे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.