बेळगाव जिल्ह्यात आज शनिवार दि. 9 ऑक्टोंबर रोजी नव्याने 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 79,812 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सध्या 106 सक्रिय रुग्ण आहेत.कर्नाटकात इंग्लंड येथून प्रवेश केलेल्या प्रवाशापैकी 10 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांना कॉरंटाईन करण्यात आले आहे.
बेळगाव जिल्ह्यात आज नव्याने 3 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येण्याबरोबरच 6 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना मुक्त झाल्याने हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 78,771 इतकी झाली आहे. जिल्ह्यात सुदैवाने आज मृत्यूची नोंद झाली नसल्यामुळे कोरोना मृत्यूचा एकुण आकडा 935 वर स्थीर आहे.
दरम्यान, संपूर्ण राज्यात आज एकूण 451 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या एकूण 29,80,621 इतकी झाली आहे. राज्यात सर्वाधिक 187 कोरोनाबाधित रुग्ण आज बेंगळूर शहरामध्ये आढळून आले असून त्याखालोखाल म्हैसूर (48), हासन (43), कारवार (37), मंगळूर (27), उडपी (21), तुमकुर (17) आणि कोडगु (14) या जिल्ह्यांमध्ये दोन आकडी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. राज्यभरात 1455 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे डिस्चार्ज रुग्णांची एकूण संख्या 29,32,322 झाली आहे.
सध्या राज्यात एकूण 10,395 सक्रिय रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे आज दिवसभरात 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे राज्यातील मृतांची एकूण संख्या 37,875 इतकी झाली आहे.
परदेशातून कर्नाटकात दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची विमानतळावरच तपासणी केली जात आहे. दरम्यान आज बेंगळूर विमानतळावर 10 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे सर्वजण इंग्लंड येथून बेळगावला आले होते. या प्रवाशांना इंग्लंड येथून पाठवत असताना त्यांची कोरोना चाचणी झाली नव्हती का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.