Monday, December 23, 2024

/

असे पार पडले बेळगावचे सीमोल्लंघन

 belgaum

बेळगाव शहराच्या परंपरेनुसार विजयादशमी निमित्त ज्योती कॉलेजनजीकच्या शिलंगण मैदानावर प्रशासनाच्या आदेशानुसार बेळगाव शहर देवस्थान कमिटीच्यावतीने वतनदार व मानकरी अशा मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत सीमोल्लंघन कार्यक्रम आज शुक्रवारी दुपारी उत्साहात पार पडला.

दसरा अर्थात विजयादशमीला बेळगाव शहरात पारंपरिक महत्त्व आहे. दरवर्षी मैदानावर सीमोल्लंघनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात नागरिकांच्या लक्षणीय उपस्थितीत पार पडतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने नागरिकांच्या संख्येवर मर्यादा आणल्याने कोरोना मार्गदर्शक सूचीचे पालन करून ज्योती कॉलेज नजीकच्या शिलंगण मैदानावर सीमोल्लंघनाचा कार्यक्रम मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत परंतु उत्साहाने पार पाडण्यात आला. याप्रसंगी दसरोत्सवाचे मानकरी बेळगाव शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आणि बेळगावचे वतनदार रणजीत चव्हाण -पाटील यांच्या हस्ते पारंपारिक विधीद्वारे शस्त्र पूजन आणि आपट्याच्या पानांचे पुजन करण्यात आले.  आमदार अनिल बेनके रमाकांत कोंडुसकर, नागेश नाईक, प्रताप मोहिते, अभिजीत आपटेकर यांच्यासह मानकरी मंडळी तसेच शहर देवस्थान कमिटी व चव्हाट गल्ली देवदादा सासन काठी (ज्योतिर्लिंग) देवस्थान कमिटीचे मोजके सदस्य यावेळी उपस्थित होते.

यावेळी बेळगाव लाईव्हशी बोलताना रणजीत चव्हाण -पाटील यांनी पारंपरिक शहराच्या सिमोल्लंघन कार्यक्रमाबाबत माहिती देऊन पुढील वर्षापासून पूर्वीप्रमाणे सीमोल्लंघन कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. शस्त्रपूजन व सिमोल्लंघनानंतर सोने लुटण्याच्या कार्यक्रमास सुरुवात झाली.

सीमोल्लंघन कार्यक्रमापूर्वी पूर्वापार परंपरा खंडित न करता कोरोना संदर्भातील शासनाचे सर्व नियम व अटी पाळून आज शहरात साधेपणाने पालखी व नंदी मिरवणूक काढण्यात आली. मागील वर्ष वगळता तत्पूर्वी विजयादशमी दिवशी सीमोल्लंघनाचा निमित्ताने शहरात 12 पालख्या निघत होत्या. या सर्व पालख्यांची ज्योती मैदानावर सीमोल्लंघनाचा ठिकाणी सांगता होत होती. मागील वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे या पालख्यांना परवानगी देण्यात आली नव्हती. परंतु यंदा नियम शिथील करून बसवान गल्ली, मारुती गल्ली, गोंधळी गल्ली आदी अन्य मोजक्या पालख्या काढण्यास परवानगी देण्यात आली होती.

आज विजयादशमी दिवशी दुपारी प्रशासनाने घालून दिलेल्या वेळेनुसार चव्हाट गल्ली येथून देवदादा सासनकाठी पालखी मानाच्या नंदीसह रवाना होऊन ज्योती कॉलेज नजीकच्या शिलंगण मैदानावर सीमोल्लंघनाचा ठिकाणी दाखल झाली. त्याचप्रमाणे इतर पालख्या थोड्याफार वेळेच्या अंतराने शिलंगण मैदानावर दाखल झाल्या होत्या. मोजक्याच मानकऱ्यांसह निघालेल्या या पालख्यांचे गल्लोगल्ली भक्तिभावाने स्वागत व पूजन केले जात होते. दरम्यान दसऱ्यानिमित्त कपिलेश्वर मंदिरामध्ये दशावतारी पूजा बांधण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.