बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या बऱ्याच नगरसेविकांचे ‘पतिराज’ आपापल्या भागातील समस्यांची पाहणी करणे, समस्या सोडविण्याचे आश्वासन देणे अशी कामे करू लागल्यामुळे प्रभागाचे नगरसेवक नेमके कोण आहेत? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून दोन महिने होत आले असले तरी अद्याप अनेक प्रभागातील नागरिकांना आपल्या नूतन नगरसेविकांचे दर्शन झालेले नाही. महापालिका सभागृहात यंदा महिलाराज दिसून येणार आहे.
कारण महापालिकेच्या निवडणुकीत एकूण 58 प्रभागांपैकी 28 प्रभागांमध्ये महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. तथापि अद्याप महापौर-उपमहापौर निवडणूक झालेले नाही. त्याचप्रमाणे घटनेनुसार अधिकार पदासाठी आवश्यक असलेला नगरसेवकांचा शपथविधी सुद्धा झालेला नाही. मात्र तरीही कांही नगरसेवकांच्या पतींची महापालिका कार्यालयामध्ये आत्तापासून ये-जा वाढली आहे.
या पतीराजांकडून प्रभागातील समस्यांची पाहणी करण्यासह त्या सोडविण्याचे आश्वासन देणे, विविध कार्यक्रमांना हजेरी लावणे असे प्रकार सुरू झाले आहेत.
निवडून आलेल्या नगरसेविका घराबाहेर पडत नसल्यामुळे प्रभागातील नागरिकांना देखील नाईलाजाने आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे नगरसेविकांच्या पतीराजांसमोर मांडावे लागत आहे. तसेच दुसरीकडे नगरसेविकांच्या पतीराजांच्या या हस्तक्षेपाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.