1993 साली तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना जो तोडगा सुचविला होता त्याचा पुनर्विचार तिला जावा. कारण सद्यपरिस्थितीत गेले कित्येक वर्ष अनिर्णीत -असलेला महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी माननीय पवार साहेबांचाचा तोडगा हा उत्तम पर्याय आहे.
याकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवार दि. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत दसरा चौक कोल्हापुर येथे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
मागील आठवड्यात मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांनी माजी आमदार आणि खानापूर समितीचे अध्यक्ष दिगंबर पाटील यांना तो तोडगा कोणता जाहीर करा असे आव्हान दिले होते त्यानंतर आता पाटील यांनी हे कोल्हापूरचे आंदोलन जाहीर केलं आहे.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्धीस दिलेल्या या प्रसिद्धीपत्रकामुळे गेल्या कांही दिवसापूर्वी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षानी सीमाप्रश्नी माजी आमदार दिगंबर पाटील यांना कोणता तोडगा सुचला तो त्यांनी जाहीर करावा असे जे आव्हान दिले होते त्याला अप्रत्यक्ष उत्तर मिळाले आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्न सुटावा यासाठी सीमावासीय जनता 1956 पासून लढा देत आहे. परंतु अद्यापही त्यांना यश आलेले नाही. महाजन आयोगाने 1967 झाली खानापूर तालुक्यातील महाराष्ट्राने मागणी केलेल्या 206 गावांपैकी 152 गावे देऊ केली होती. परंतु बेळगाव शहरासाठी आम्ही त्यांच्या बरोबरीने गेली 55 वर्षे लढा देत आहोत. महाराष्ट्र शासनाच्यावतीने 2004 साली सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केला असला तरी तो इंचभर देखील पुढे सरकलेला नाही. कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी भाषा संस्कृती नष्ट व्हावी यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. त्यामुळे येथील मराठी माणूस व्याकूळ व चिंताग्रस्त झाला आहे. सध्या सीमाभागातील कारवार, सुपा, हल्याळ भागातील मराठी भाषा -संस्कृती नामशेष झाली आहे. त्याचप्रमाणे बेळगाव, खानापूर व निपाणीसह सीमाभागातील मराठी भाषा व संस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
आजपर्यंत माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधी, शिवसेना प्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे, कै. शंकरराव चव्हाण माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सीमाप्रश्न सोडवणुकी संदर्भात वेगवेगळे पर्याय सुचवले होते. मात्र या सर्व पर्यायात 1993 साली तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना एक तोडगा काढला होता. त्यामध्ये तडजोड करून सीमाप्रश्न निकालात काढला जाणार होता. मात्र या प्रस्तावाला कांही नेत्यांनी विरोध केल्याने हा प्रस्ताव मागे पडला. तथापि आज देखील सीमा भागातील परिस्थिती पाहता शरद पवार यांनी 93 साली सुचवलेल्या प्रस्तावाचा पुनर्विचार करून सीमाप्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा. अन्यथा गेली 65 वर्षे चाललेला हा लढा ज्यामध्ये अनेकांनी हौतात्म्य पत्करले हालअपेष्टा सोसल्या, अत्याचार सहन केले, लोकशाही मार्गाने विविध लढेही दिले हे सर्व वाया जाणार अशी भीती वाटत आहे. जर तसे झाल्यास येणारी पिढी आपल्याला कदापि माफ करणार नाही. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व नेतेमंडळींनी याबाबत ठोस भूमिका घेऊन शरद पवार यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच केंद्रीय नेतृत्वाकडे या तोडगे याबाबत पाठपुरावा करून सीमा प्रश्नाची सोडवणूक करावी, अशा आशयाचा तपशील खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे. सदर पत्रकावर खानापूर समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील कार्याध्यक्ष यशवंत बिरजे प्रकाश चव्हाण प्रतापराव सरदेसाई आणि विशाल पाटील यांच्या स्वाक्षर्या आहेत
दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सुचविलेल्या तोडग्या संदर्भात महाराष्ट्रातील नेतेमंडळी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिली आहेत. आता संबंधित तोडग्याकडे त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी कोल्हापूरच्या दसरा चौकात 30 ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याचे माजी आमदार पाटील यांनी स्पष्ट केले आहे. हे स्पष्टीकरण म्हणजे गेल्या कांही दिवसांपूर्वी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांनी सीमाप्रश्नी तोडग्यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला माजी आमदार दिगंबर पाटील यांनी दिलेले उत्तर असल्याचे बोलले जात आहे.