बेळगावात फक्त 15 टक्के मराठी भाषिक असल्याचा अजब निष्कर्ष कर्नाटक सरकारने काढला आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांचा लढा कमजोर करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला असून या विरोधात आपल्याला कोर्टात जावे लागेल असे म्हंटले आहे.
कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी भाषिक जनतेची मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न सातत्याने करत असते. बेळगाव, निपाणी, कारवारमधील मराठी भाषिकांवर सतत अन्याय केला जातो.
आता कर्नाटक सरकारने केलेल्या भाषेत जनगणनेत मराठी भाषिकांची संख्या कमी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कर्नाटक सरकारकडून कांही दिवसांपूर्वी भाषिक जनगणना करण्यात आली.
या भाषिक जनगणनेमध्ये बेळगावात 15 टक्के मराठी भाषिक असल्याचा अजब निष्कर्ष काढण्यात आला आहे. यामुळे समस्त मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात बोलताना बेळगावात मराठी भाषिकांची संख्या 15 टक्के असल्याचे दाखवून मराठी भाषिकांचा सीमालढा कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला.
कर्नाटक सरकारचे हे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे. यासाठी वेळ आल्यास आपल्याला कोर्टात जावे लागेल असे सांगून कर्नाटक सरकारने बेळगावात मराठी भाषिकांची टक्केवारी जाहीर करताना कोणता निकष लावून जनगणना केली याची माहिती देखील घ्यावी लागेल, असे मंत्री सतेज पाटील म्हणाले.