बेनकनहळ्ळी येथील युवक संजय भरमा पाटील यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या सर्व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी गावातील पंच कमिटीसह गावकरी आणि नातेवाईकांनी आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली
बेनकनहळ्ळी येथील संजय भरमा पाटील (वय 31) या युवकाने गेल्या 22 ऑक्टोबर रोजी गावाशेजारील हिरोजी मळा येथे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याचे गावातीलच एका मुलीवर प्रेम होते. परंतु मुलीच्या घरच्यांचा याला विरोध होता.
आमच्या मुलीच्या नादाला लागलास तर याद राख अशी तंबी त्यांनी संजयला दिली होती. एवढेच नाही तर त्याच्या आत्महत्येच्या आदल्या दिवशीच मुलीच्या घरच्यांनी त्याच्या घरी येऊन संजयच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोपही संजयच्या कुटुंबीयांनी केला आहे. ही गोष्ट मनाला लावून घेऊन संजयने आत्महत्या केली असून याला जबाबदार असणाऱ्या सर्व आरोपींना अटक करून कठोर शासन करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेनकनहळ्ळी गावच्या पंच मंडळींसह ग्रामस्थ आणि संजयच्या कुटुंबियांनी जोरदार निदर्शने केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी संजयला न्याय देण्याच्या मागणीच्या घोषणा देण्यात येत होत्या.
मयत संजयच्या नातलग अनिता पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना मुलाला मुलीच्या घरच्यांनी धमकी दिली होती. आत्महत्येच्या आदल्या दिवशी त्यांनी संजयच्या घरी येऊन डोळ्यात मिरची पूड टाकून हल्ला केला होता. त्याला घाबरून आमच्या मुलाने आत्महत्या केली आहे.
आमच्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. देसुरकर कुटुंबीयांनी संगनमताने संजयला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी अनिता पाटील यांनी केली. दरम्यान या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींचे अटकसत्र सुरू ठेवले असून आणखी कोणाला अटक होणार याची प्रतीक्षा आहे