येत्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कर्नाटकातील भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तार होण्याची शक्यता असल्याने आमदार रमेश जारकीहोळी यांनी दिल्लीमध्ये तळ ठोकला असून यावेळी कोणत्याही परिस्थितीत मंत्रीपद मिळवण्याचा त्यांचा निर्धार असल्याचे समजते.
गेल्या तीन दिवसापासून आमदार रमेश जारकीहोळी नवी दिल्ली येथे मुक्कामास आहेत. त्या ठिकाणी वरिष्ठ भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन कर्नाटक मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी त्यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले असल्याचे कळते. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत गोकाक विधानसभा मतदारसंघातून मी भाजपला बहुमत मिळवून दिले आहे.
जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकांमध्ये भाजपला विजयी करीनच तसेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपला विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघात भाजपला विजयी करण्याचा माझा प्रयत्न राहील. मात्र यासाठी मला मंत्रिपद दिल्यास अनुकूल होईल, असे सांगून आमदार जारकीहोळी मंत्रिपदासाठी लॉबी तयार करत असल्याचे समजते.
अश्लिल सीडी प्रकरणात आमदार रमेश जारकीहोळी यांना मंत्रीपद गमवावे लागले होते. अद्याप न मिटलेले हे प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता लक्षात घेऊन यासंदर्भात ‘बी’ रिपोर्टसाठी आमदार रमेश जारकिहोळी प्रयत्नशील असल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे.