भरधाव अज्ञात अवजड वाहनाने धडक दिल्यामुळे जवळपास 30 तास जखमी अवस्थेत रस्त्याकडेला पडून असलेल्या एका बैलाला सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे जीवदान मिळाल्याची घटना भुतरामहट्टी येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की, भुतरामहट्टी येथील महामार्गावर गेल्या गुरुवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास भरधाव अज्ञात अवजड वाहनाने एका बैलाला धडक देऊन पोबारा केला. जोरदार धडकेमुळे गंभीर जखमी झालेला हा बैल रस्त्याशेजारी पडून होता.
हा प्रकार काल शुक्रवारी पहाटे या मार्गावरून जाणाऱ्या कांही पुढारी व पत्रकारांच्या निदर्शनास येताच त्यांनी ताबडतोब हा माझा धर्म पशू बचाव दल संघटनेच्या विनायक केसरकर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तेंव्हा विनायक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
त्यावेळी वाहनाच्या ठोकरीमुळे जखमी झालेल्या बैलाचे दोन पाय अधू झाल्याचे आणि त्याला जागचे हलता येत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रथम त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. तसेच त्याला हलविण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली.
विनायक केसरकर मेघना चौगुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्री सिद्धेश्वर क्रेन सर्व्हिसच्या मदतीने जवळपास 30 तास रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या त्या जखमी बैलाला सकाळी 11 च्या सुमारास सुखरूपपणे नजीकच्या मुक्तीमठ येथील गोशाळेत नेऊन दाखल केले.