विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडून निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सरकारच्या विद्यार्थी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले.
सदर आंदोलनात शहर परिसरातील महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी -विद्यार्थिनी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने करून जिल्हाधिकारी कार्यालय आवार दणाणून सोडले होते. यावेळी बोलताना अभाविप नेता रोहित उमनाबादीमठ याने विद्यार्थ्यांच्या या मागण्या प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडल्या.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सर्व गावांना सुरळीत बससेवा सुरू करावी. तसेच विद्यार्थ्यांना लवकरात लवकर बस पास उपलब्ध करून द्यावेत. गेल्या महिनाभरापासून बस पाससाठी अर्ज विनंत्या केल्या जात आहेत. तथापि अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
तेंव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः मध्यस्थी करून विद्यार्थ्यांना बसपास मिळवून द्यावेत. राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या शिष्यवृत्तींचा निधी तात्काळ मंजूर करावा. याखेरीज विद्यार्थी वस्तीगृहांबाबतच्या समस्या दूर केल्या जाव्यात आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले असल्याची माहिती उमनाबादीमठ याने दिली.