बेंगलोर येथील अधिवेशनात बेळगावात विधिमंडळाचे अधिवेशन घेण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशनात बेळगावात होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
बेंगलोरमध्ये सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून त्यासाठी पुरवणी अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यामध्ये बेळगावमधील सुवर्ण विधानसौधमध्ये हिवाळी अधिवेशन घेण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. या अधिवेशनासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याद्वारे अधिवेशन भरविणे आणि दुरुस्ती संदर्भातील कामे हाती घेतली जाणार आहेत.
तीन वर्षानंतर बेळगावात अधिवेशन होणार असून सीमाभागावर आपला हक्क सांगण्यासह मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ सोडण्याचा प्रयत्न पुन्हा कर्नाटक सरकारकडून होणार आहे.
हालगा -बस्तवाड येथील सुवर्णसौध इमारत खरेतर पांढरा हत्ती ठरला आहे. सुवर्ण विधानसौधच्या देखभालीवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.
अलीकडे कांही सरकारी कार्यालये या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली असली तरी या सुवर्णसौधचा वापर वाढविण्यासह विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हिवाळी अधिवेशनाची औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे.