बेळगाव महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाद्या पक्षाची सत्ता आली आहे. कर्नाटकात सत्तेवर असलेल्या भाजप चे जास्तीतजास्त नगरसेवक बेळगाव महानगरपालिकेत निवडून आले. या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.
सध्या कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोंमाई बेळगावच्या दौऱ्यावर आले आहेत. हा दौरा दिवंगत सुरेश अंगडी यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी प्रामुख्याने चर्चेत असला तरी त्या निमित्ताने बेळगावचा महापौर ठरला जाणार का ही चर्चा भाजप च्या अंतर्गत वर्तुळात जोरात सुरू आहे.अनेकजण इच्छूक असताना सध्या दावेदार कोण होणार आणि भाजप वरिष्ठ नेत्यांकडून कुणाचे नाव घोषित होणार? याची जोरात चर्चा सुरू आहे.
मनपा निवडणुकीत भाजप चे जास्त उमेदवार निवडून आणण्यात बेळगाव उत्तर आणि बेळगाव दक्षिण या दोन आमदारांची भूमिका महत्वाची ठरली आहे. बेळगाव दक्षिण मधील विजयी नगरसेवकांची संख्या जास्त आहे,त्यामुळे दक्षिण भागातला महापौर आणि उत्तर चा उपमहापौर असे गणित राबविले जाण्याची शक्यता आहे.
भाजप पक्षात असले तरी मराठी भाषिक नगरसेवक जास्त असल्यामुळे मराठी भाषिक महापौर आणि कन्नड भाषिक उपमहापौर होईल अशी चर्चा जोरात आहे. कन्नडिगांनी कितीही भुई थोपटली तरी भाजप सत्तेतही मराठी माणूसच अधिक बाजू मारून गेल्यामुळे मराठी महापौर करावा लागणार आहे.
सध्या मंगेश पवार हे महापौर पदासाठी तर कणबर्गी च्या सविता पाटील उपमहापौर पदासाठी जास्त चर्चेत आहेत.उत्तर दक्षिण चे गणित आणि मराठी कन्नड चे समीकरण साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या निमित्ताने आज घोषणा होणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.