खानापूर तालुक्यातील कणकुंबी बारवाड मार्गावर विद्युत भारित तारेच्या स्पर्शाने गव्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
सदर प्रकाराची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला तसेच मृत गव्यावर अंत्यसंस्कारही केले. सदर गवा काल मध्यरात्री मृत्युमुखी पडला असावा असा कयास आहे.
कणकुंबी येथून पारवाड गावाला वीज पुरवठा करण्यासाठी रस्त्याच्या बाजूने विद्युत वाहिनी गेली आहे. ही विद्युत वाहिनी अतिवृष्टीमुळे कांही ठिकाणी जमिनीलगत लोंबकळत आहे. जमिनीपासून अवघ्या कांही फुटावर लोंबकळणाऱ्या या विजेच्या तारांमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
यामुळेच पारवाड रस्त्यावर गव्याचा हकनाक मृत्यू झाला असून याला हेस्कॉमचा बेजबाबदारपणाचा कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. तरी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन संबंधित विद्युत तारांची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.