बेळगाव महापालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या बसवन कुडची येथील मतदान केंद्राच्या ठिकाणी काल रातोरात भाजप किसान मोर्चाच्या एका स्थानिक दिवंगत नेत्याचे बॅनर्स लावण्यात आल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे. तसेच निवडणूक आचारसंहितेचा भंग करून राजकीय स्वार्थासाठी केलेल्या या प्रकारामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी उत्साहात प्रारंभ झाला आहे. तथापि महापालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या बसवन कुडची येथील मतदान केंद्राच्या परिसरात भाजप किसान मोर्चाचे स्थानिक दिवंगत अध्यक्ष प्रमोद पाटील यांचे बॅनर लावण्यात आले आहेत.
निवडणूक आचार संहितेनुसार यावेळी सार्वजनिक ठिकाणी भित्तीपत्रके, बॅनर वगैरे लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तथापि हा नियम पायदळी तुडवून काल रातोरात बसवन कुडची येथील शाळेत असलेल्या मतदान केंद्राच्या भिंतीवर आणि परिसरात दिवंगत प्रमोद पाटील यांचे छायाचित्रासह मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत. या ठिकाणच्या चौकात लाल -पिवळा ध्वज उभारून दिवंगत पाटील यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले आहे.
निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या या प्रकारामुळे या ठिकाणच्या मतदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भाजप किसान मोर्चाचे दिवंगत अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्याबद्दल स्थानिक लोकांमध्ये सहानभूती आणि प्रेम आहे.
तथापि त्यांच्या नांवाचा गैरफायदा महापालिका निवडणुकीत राजकीय स्वार्थासाठी घेतला जात असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच काल रातोरात लावण्यात आलेले हे बॅनर्स मतदानाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी तात्काळ हटवण्याची जोरदार मागणी केली जात आहे.