पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुक्रवारी कर्नाटकात राबविण्यात आलेल्या राज्यव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण महाअभियानांतर्गत बेळगाव जिल्ह्यात दोन लाख 21हजार 740 जणांना लसीकरण करण्यात आले आहे.त्यात बेळगाव तालुक्यात 46591 जणांचे लसीकरण झाले आहे.
सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1 लाख 73 हजार 121 जणांचे लसीकरण करण्यात आले होते.
राज्यव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण महाअभियाना अंतर्गत बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा व तालुका आरोग्य खात्यातर्फे आज जिल्ह्यात लसीचे 3 लाख डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यासाठी सर्व सरकारी आणि बहुतांश खाजगी हॉस्पिटल्ससह ग्रामपंचायत व तालुका पंचायत पातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्रे, समुदाय भवन आदी ठिकाणी लसीकरण केंद्रे उघडण्यात आली होती.
या पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यात 652 ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा पहावयास मिळत होत्या. लसीकरणाच्या या महाअभियानाअंतर्गत जिल्ह्यात दुपारी 1:30 वाजेपर्यंत लसीचे 73 हजार 735 डोस देण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही संख्या वाढत जाऊन 1 लाख 73 हजार 121 डोस इतकी झाली होती.
राज्यव्यापी बृहत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा व तालुका आरोग्य खाते आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शहरातील 18 खाजगी हॉस्पिटल्समध्ये आज मोफत कोरोना लसीकरण शिबिरं पार पडली. शहरातील संबंधित सर्व हॉस्पिटल्समध्ये सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत हे शिबिर घेण्यात आले. कसबेकर मटगुड हॉस्पिटल (शिवाजीनगर), वेणुग्राम हॉस्पिटल (तिसरे रेल्वे गेट टिळकवाडी), श्री ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर (सन्मान हॉटेल मागे), डेक्कन मेडिकल सेंटर (रेल्वे ब्रिज जवळ), व्हीनस हॉस्पिटल (महात्मा फुले रोड शहापूर), स्पंदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (शिवबसवनगर), लाईफ लाईन हॉस्पिटल (अनगोळ मेन रोड), यश हॉस्पिटल (महाद्वार रोड शहापूर), भाटे हॉस्पिटल (बीम्स जवळ), येळ्ळूर रोड केएलई हॉस्पिटल, लेक व्ह्यू हॉस्पिटल (गांधीनगर), लाईफ केअर हॉस्पिटल (दरबार गल्ली), श्री साई हॉस्पिटल (वडगाव), लोटस हॉस्पिटल (मंडोळी रोड टिळकवाडी), अपूर्व हॉस्पिटल (शिवाजी उद्यानानजीक), विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर (आयोध्यानगर), धन्वंतरी हॉस्पिटल (सुभाषनगर) व लेक व्ह्यू हॉस्पिटल गोवावेस या ठिकाणी आयोजित केलेल्या मोफत लसीकरण शिबिरास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या सर्व हॉस्पिटलसमोर आज दिवसभर कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.
17 नवीन कोरोना बाधित
बेळगाव जिल्ह्यात आज शुक्रवारी नव्याने 17 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज आणखी तिघाजणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला.
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 307 वर पोहोचली आहे. तसेच कोरोना बाधित तिघांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या 907 झाली आहे. आज शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 73 हजार 121 जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. दरम्यान राज्यात आज दिवसभर नव्याने 1003 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.