आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार वयाचे कारण पुढे करून तिकीट नाकारले गेल्यास आपण बेळगाव किंवा चिकोडी लोकसभा मतदारसंघात नशीब आजमावणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी दिली.
हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज देश व राज्यात भारतीय जनता पक्षाचे मजबूत सरकार आहे. अजून दहा वर्षे आपण आमदारकीसाठी इच्छुक आहोत. तथापि नव्या पिढीला अर्थात युवावर्गाला संधी देण्याच्या पक्षाच्या धोरणामुळे माझे आमदारकीचे तिकीट रद्द झाल्यास खासदारकीसाठी प्रयत्न करणार आहे.
बेळगाव किंवा चिकोडी दोन्ही पर्याय माझ्यासाठी खुले असतील. शिवाय रमेश कत्तीही खासदारकीसाठी इच्छुक असून त्यांनी सोडलेल्या जागेवर मी निवडणूक लढविणे, असे मंत्री उमेश कत्ती यांनी स्पष्ट केले.
या सगळ्याला अद्याप थोडा अवधी आहे, तोपर्यंत आपण हुक्केरी मतदारसंघातील संकेश्वर व हुक्केरी शहरासाठी भुयारी गटार, मल्लीकार्जुन पाणी योजना, तालुक्यातील उर्वरित सतरा तलाव भरणी कार्यक्रम,
हिडकल डॅम येथे 100 कोटी खर्चून म्हैसूरच्या धरतीवर आधुनिक तंत्रज्ञान वापरून वृंदावन गार्डन निर्मिती, हुक्केरी तालुका टुरिझम केंद्र बनविणे, संगम बॅरेजमधून हिरण्यकेशी नदी भरणे ही कामे मला पूर्ण करायची आहेत. मला आमदार करणाऱ्या जनतेला विकास कामाच्या माध्यमातून मला धन्यवाद द्यावयाचे आहेत, असेही मंत्री कत्ती यांनी सांगितले.