Sunday, November 17, 2024

/

21 दिवसांचा गणपती!

 belgaum

गणपती किती दिवसांचा असतो? तर एक दिवस. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस आणि विधीप्रमाणे सर्वाधिक काळासाठी बसणारा म्हणजे 11 दिवस…

पण बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर या पुणे – बंगळूर महामार्गवरच्या गावात एक गणपती तब्बल 21 दिवस प्रतिष्ठापीत असतो! हो, तब्बल 21 दिवस. आणि तो गणपती पाहण्यासाठी खूप दुरून दुरून भक्त अनंत चतुर्दशीला आपले आसपासचे गणपती गेल्यानंतर संकेश्र्वरला येतात. त्या गणपतीचे नाव आहे निलगार गणपती.

संकेश्वर (जि. बेळगाव) येथील निलगार गणपतीची ख्याती कर्नाटकासह गोवा, महाराष्ट्रात आहे. दरवर्षी 21 दिवस पूजन केला जाणाऱ्या या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची झुंबड उडते. इतकी की अनंत चतुर्दशीनंतर निलगार गणपतीच्या दर्शनाला संकेश्वरात सुमारे 2 किमी रांगा लागतात.

हेद्दूरशेट्टी नामक घराण्यातर्फे हा गणपती घरातच पूजला जातो. पण त्याला सार्वजनिक स्वरूप आले आहे.
नवसाला पावणारा गणपती, अशी या गणपतीची मोठी ख्याती आहे. दरवर्षी गणेश चतुर्थीपासून सदर मूर्तीचे 21 दिवस पूजन करण्यात येते.

निलगार गणपती 21 दिवस पूजला जातो?
याबाबत हेद्दूरशेट्टी या घराण्यातील काही सदस्यांकडून जाणून घेतले असता, ते म्हणतात की ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. जेव्हापासून आम्हाला कळायला लागल तेव्हापासूनच आम्ही 21 दिवस गणपती पूजती. आम्ही रोज एक वेळ या गणपतीची पूजा करतो.

हेद्दूरशेट्टी घराण्यातील सदस्य पूर्वी सूतकाम व रंगकाम करत होते. यावेळी सूत कामामध्ये निळा रंग देण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असायचे. त्यामुळे निळ्या रंगात काम करणाऱ्यांचा गणपती म्हणून निलगार गणपती असे नाव पडले.
निलगार गणपतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गणपतीचा एकही फोटो उपलब्ध नाही. शेकडो वर्षापासून या गणपतीचे फोटो न काढण्याची प्रथा आहे. त्यामुळे घरच्या सदस्यांकडूनही तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडूनही या गणपतीचा फोटो काढण्यात येत नाही.

विशेष म्हणजे 21 दिवसांनंतर या गणपतीची गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते.

अनंत चतुर्दशीनंतर इथे खरे तर एक जत्राच भरते. भक्तांच्या रांगा लागत असल्यामुळे त्यांच्या गरजा पूर्ण करणारी एक समांतर व्यवस्थाच इथे तयार होते. छोटी हॉटेल, खाद्य पदार्थ विकणारे गाडे, पाणी बाटल्या पुरवणारी मुले, लहान मुलांची खेळणी, छत्र्या असा बाजार 21 दिवस भरतो.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.