दूध सागर धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनास गेलेल्या बेंगलोरच्या युवा ट्रेकर्सनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा रेल्वे अपघात टळल्याची घटना नुकतीच घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बेंगलोर येथील गौरव टी. आर., कौशिक, प्रज्वल, मनीषा, प्रितेश आणि विनोद हे सहा युवा ट्रेकर्स गेल्या सोमवारी पर्यटनासाठी दूध सागर धबधबाच्या ठिकाणी गेले होते. दूधसागर येथील व्ह्यू पॉईंटवरून धबधब्याचा आनंद लुटून हे सहाही ट्रॅक्टर्स दुपारी अडीच तीनच्या सुमारास माघारी परतत असताना तेथील रेल्वेमार्गावर एक प्रचंड मोठे झाड कोसळले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
नेमक्या त्याच वेळी रेल्वेच्या हॉर्नचा आवाज त्यांच्या कानी आला. झाड ज्या ठिकाणी कोसळले होते त्या ठिकाणी वळणदार रेल्वेमार्ग असल्यामुळे येणाऱ्या रेल्वेच्या चालकाला रुळावर कोसळलेले झाड दिसणार नाही आणि मोठा अनर्थ घडणार हे लक्षात घेऊन गौरव आणि त्यांच्या सहकार्यांनी जॅकेट टॉवेल वगैरे फडकवत रेल्वेला थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला. बेंगलोरच्या गौरव टी. आर. यांनी समयसूचकता दाखवत आपल्यातील एकाच्या अंगावर लाल टी शर्ट आहे हे लक्षात घेऊन त्याला थेट रेल्वे रुळाच्या मधोमध उभे केले जेणेकरून लाल रंग पाहून रेल्वे थांबेल. गौरवसह सहाही ट्रेकर्सनी धावाधाव करून केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले, जेंव्हा वेगाने येणारी रेल्वे झाड कोसळलेल्या ठिकाणापासून अवघ्या 10 मीटर अंतरावर येऊन थांबली.
रेल्वे थांबताच रेल्वेच्या चालकांसह त्याच्या सोबत असणारा सहसंचालक व अन्य दोन कर्मचाऱ्यांनी रुळावर कोसळलेले झाड पाहून सर्वप्रथम गौरव आणि त्यांच्या साथीदारांचे आभार मानले. त्यानंतर सर्वांनी मिळून महत्प्रयासाने रेल्वे रुळावरील झाड बाजूला हटविले.
दूध सागर धबधब्याच्या व्ह्यू पॉईंटपासून सुमारे 1 कि. मी. अंतरावर ही घटना घडली. झाड रुळावर कोसळल्याचे ट्रेकर्सच्या वेळीच निदर्शनास आले आणि त्यांनी रेल्वे थांबवली म्हणून ठीक, त्याचप्रमाणे संबंधित रेल्वे ही प्रवासी नसून मालवाहू होती अन्यथा मोठा अनर्थ घडला असता असे या घटनेची माहिती मिळालेल्यामध्ये बोलले जात आहे.
उपरोक्त घटनेनंतर गौरव टी. आर. यांच्यासह त्यांचे सहकारी कौशिक, प्रज्वल, मनीषा, प्रितेश आणि विनोद यांच्या प्रसंगावधान आणि धाडसाचे दूधसागर परिसरात कौतुक होत होते.