शेतकर्यांना 24 तास वीजपुरवठा मिळावा यासाठी राज्यात ट्रान्सफॉर्मर बँक सुरू करण्याबाबत शासनाच्या पातळीवर प्राथमिक चर्चेसह त्याला अंतिम स्वरूप देण्याची तयारी सुरू झाली असल्यामुळे बेळगावसह प्रत्येक जिल्ह्यात लवकरच ट्रान्सफॉर्मर बँक स्थापन होणार आहे.
वीज समस्या सोडविण्यासाठी वीज उपकेंद्रांची निर्मिती करून भार कमी करण्याचे धोरण सरकारने राबविले आहे. याद्वारे ग्रामीण भागात सुरळीत घरगुती वीज देण्यासह शेतीसाठी दिवसातून 7 तास थ्री फेज वीज पुरवठा करण्याचे नियोजन आहे.
तत्कालीन ऊर्जामंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्या कार्यकाळात ट्रान्सफॉर्मर बँकेबाबत चर्चा झाली होती. मात्र त्याला आता दिशा मिळत आहे. विद्यमान ऊर्जामंत्री सुनील कुमार यांनी या योजनेला अंतिम रूप देण्याचे ठरविले आहे.
यासंदर्भात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकी घेतली असून प्रत्येक जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर बँक स्थापण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार बेळगाव सर्वच जिल्ह्यांमध्ये याबाबत नियोजन सुरू झाले आहे. ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यास त्यांच्या दुरुस्तीसाठी बराच वेळ लागतो त्यामुळे शेतीची कामे खोळंबून राहतात.
मात्र ट्रान्सफॉर्मर बँकेमुळे 24 तासांत नवा ट्रान्सफॉर्मर मिळण्याची व्यवस्था होणार आहे. ऊर्जामंत्री सुनील कुमार यांनी ट्रांसफार्मर बँकेबाबत केलेल्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.