कोरोना प्रादुर्भावामुळे कांही निर्बंध पाळावे लागत असले तरी धारवाड क्रिकेट विभाग (झोन) यावर्षी देखील नेहमीच्या सर्व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करत आहे. मात्र कोरोना आणि बायोबबलमुळे रणजी सारख्या मोठ्या सामन्यांचे बेळगावमध्ये आयोजन करण्यास परवानगी मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे? अशी माहिती धारवाड क्रिकेट झोनचे निमंत्रक अविनाश पोतदार यांनी दिली.
लॉक डाउननंतरचे क्रिकेट उपक्रम आणि मोठ्या स्पर्धांचे आयोजन यासंदर्भात अविनाश पोतदार बेळगाव लाइव्हशी बोलत होते. कोरोना आणि लाॅक डाऊनमुळे मागील वर्षी प्रारंभी क्रिकेट क्षेत्राला फटका बसला असला तरी त्यावेळी 16, 19, 23 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धा यशस्वीरीत्या घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेशी (केएससीए) संलग्न सर्व क्रिकेट स्पर्धा मागील वर्षी झाल्या.
धारवाड झोनचा संघ बेंगलोरला जाऊन खेळून आला. यंदाची 19 वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत धारवाड झोनच्या संघाने पाचपैकी दोन सामने जिंकले. आता 25 वर्षाखालील मुलांच्या संघाची निवड झाली असून सदर संघ बेंगलोर येथील स्पर्धेत भाग घेण्यासाठी लवकरच रवाना होणार आहे. त्याप्रमाणे आता पुढील महिन्यात 16 वर्षाखालील स्पर्धा देखील होणार आहे एकंदर केएससीएशी संलग्न सर्व क्रिकेट स्पर्धा यंदा होणार आहेत, असे पोतदार यांनी सांगितले.
केएससीएच्या ऑटोनगर, बेळगांव येथील स्टेडियमवर यंदा मोठे सामने होतील की नाही शंका आहे. कारण कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बायोबबलमुळे रणजी, आयपीएल वगैरे सर्व मोठे क्रिकेट सामने बेंगलोरमध्ये होणार असल्याचे समजते. पूर्वी रणजी ट्रॉफी वगैरे सारखे मोठे सामने भरवण्याची संधी आम्हाला मिळाली होती. मात्र यावेळी कोरोनामुळे त्याबद्दल साशंकता आहे. जर यदाकदाचित कोरोना नियम बदलले तर आम्हाला मोठे सामने भरवण्याची संधी मिळू शकते, अन्यथा नेहमीप्रमाणे फर्स्ट डिव्हिजन सेकंड डिव्हिजन आणि थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा आम्ही भरवणार आहोत.
एकंदर कोरोना आणि बायोबबलमुळे बेळगावच्या स्टेडियमवर यंदा रणजी ट्रॉफी सारख्या सामन्यांच्या आयोजनाबाबत आम्ही साशंक आहोत, असे धारवाड क्रिकेट विभागाचे निमंत्रक अविनाश पोतदार यांनी स्पष्ट केले.