मोदी सरकारच्या विरोधात तुमच्या मनात संताप आहे? त्यांच्या अपयशाच्या विषयी तुम्हाला राग आहे? तर मग तो व्यक्त करण्याची संधी काँग्रेस तुम्हाला देत आहे. देशाचे पहिले पंतप्रधान चाचा नेहरू यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येत्या 14 नोव्हेंबर रोजी ‘युवा भारताचा आवाज’ या शीर्षकाखाली काँग्रेसने वक्तृत्व अर्थात भाषण स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती अ. भा. युवा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरभी द्विवेदी यांनी दिली.
शहरातील काँग्रेस भवन येथे आज गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पहिल्या टप्प्यात 10 ऑक्टोबर रोजी बेळगाव आणि चिक्कोडी येथे ही वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येईल यातील पहिल्या 5 क्रमांकाच्या विजेत्यांना जिल्हा प्रवक्ता म्हणून राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेण्याची संधी दिली जाईल.
राज्य स्पर्धेतील 10 विजेत्यांना राज्य प्रवक्ता म्हणून राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळेल. राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्यांना युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नेमणूक करणार आहेत, अशी माहिती द्विवेदी यांनी दिली.
एकंदर कोरोना नियंत्रणाखाली आणण्यात अपयश, इंधन दरवाढ नियंत्रणात अपयश आदी मुद्यांवरून काँग्रेसने भाजप सरकार विरोधात अनोख्या पद्धतीने जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषदेस काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विनय नावलगट्टी, आदी उपस्थित होते.