जंगलात दुर्गम भागात असणाऱ्या शालेय मुलांना अभ्यासाच्या पुस्तकांव्यतिरिक्त अन्य माहितीपूर्ण पुस्तके उपलब्ध करून देण्याद्वारे त्यांचे ज्ञान अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने फेसबुक फ्रेंड्स सर्कलने ऑपरेशन मदतच्या सहकार्याने सुरू केलेल्या 8 मिनी लायब्ररी अर्थात लघु ग्रंथालयांचा उद्घाटन समारंभ आज सकाळी उत्साहात पार पडला.
कॅम्प येथील बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सी ई ओ आनंद के., पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, सेंट्रल लायब्ररी बेळगावचे उपसंचालक रामय्या जी., ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर, किरण निप्पाणीकर आणि गुजरात भवनचे जेष्ठ संचालक भूपेंद्र पटेल उपस्थित होते. प्रारंभी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने समारंभास ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात प्रमुख पाहुणे आनंद के., डॉ आमटे आणि कागणीकर यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या कार्याचा गौरव केला. तसेच दुर्गम भागातील शालेय मुलांसाठीच्या लघु ग्रंथालयाचा हा उपक्रम आदर्शवत असल्याचे नमूद केले.
प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर ग्रंथालय सुरू करण्यात आलेल्या शाळांच्या शिक्षकांकडे ग्रंथालयासाठी आवश्यक पुस्तके सुपूर्द करण्यात आली. यावेळी संबंधित शिक्षकांनी जंगल प्रदेशातील शाळा संदर्भातील आपला अनुभव कथन केला. या समारंभाचे औचित्य साधून समर्थ मोदगेकर (इयत्ता 5 वी), राजवर्धन सागर देसाई (इयत्ता 8वी) आणि शौर्य सागर सरदेसाई या तीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली.
फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि ऑपरेशन मदत यांच्यातर्फे खानापूर तालुक्यातील जंगल प्रदेशात असलेल्या तळवडे, गोल्याळी, तारोळी, कालमणी व देवाचीहट्टी येथील प्राथमिक मराठी शाळांमध्ये मुलांसाठी लघु ग्रंथालय स्थापण्यात आले आहे. याखेरीज पार्वतीदेवी एम. शिंत्रे रुरल डेव्हलपमेंट सोसायटी कुर्ली (निपाणी), ह्युमॅनिटी फाउंडेशन बेळगाव आणि विश्वास फाउंडेशन बेळगाव या ठिकाणी देखील ही लघु ग्रंथालय सुरू करण्यात आली आहेत.
उद्घाटन समारंभाप्रसंगी डॉ. समीर शेख, व्हीक्टर फ्रान्सिस, ऑपरेशन मदतचे प्रमुख राहुल पाटील, कॅन्टोनमेंट प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे यांच्यासह फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि ऑपरेशन मदतच्या अन्य सदस्यांसह निमंत्रित व हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष दरेकर यांनी केले. लघु ग्रंथालयांसाठी देणगीदाखल देण्यात आलेली पुस्तके ही इंग्लिश, कन्नड आणि मराठी भाषेतील असून शौर्य कथा, कविता, सामान्य ज्ञान, शब्दकोश, अंतराळ अभ्यास आदी सर्व प्रकारच्या पुस्तकांचा त्यामध्ये समावेश आहे.