घरच्या हलाखीच्या परिस्थितीला टक्कर देत जिद्द न सोडता सामाजिक संस्थांनी दिलेल्या साथीच्या जोरावर वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर बनलेल्या मुजम्मा या विद्यार्थिनीचा रविवारी बेळगावात सत्कार करून तिच्या जिद्दीला सलाम करण्यात आला.
मुजम्मा हिच्या घरी दारिद्र्य पाचवीला पुजलेले, तथापि चिकाटी न सोडता बीएएमएसचे शिक्षण पूर्ण करायचे या जिद्दीने कधी चहा बिस्किटांवर भूक भागवून तर कधी उपाशी राहून तिने जिद्दीने बीएएमएस ही डॉक्टरीची पदवी संपादन केली. शहरातील कणबर्गी रस्त्यावरील देसाई लॉन येथे रविवारी एका समारंभात तिचा सत्कार करून तिच्या जिद्दीला सलाम करण्यात आला.
मुजम्मा ही मूळची गुजरातची असून बीएएमएस अभ्यासक्रमासाठी तिने ऑनलाइन अर्ज केला होता. त्यामुळे तिला बेळगावच्या रुरल आयुर्वेदिक कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. घरच्या गरीबीमुळे तिला जेवणाचीही भ्रांत होती. अन्नाच्या एका घासाला महाग असलेल्या मुजम्माने कधी चहा-बिस्कीटावर भागवले तर कधी उपाशी राहिली. तिची व्यथा जाणून घरमालकाने आपल्या घरीच तिच्या जेवणाची सोय केली.
तिच्या बाबत माहिती मिळाल्यानंतर कांही सामाजिक संस्था आणि समाजसेवकांनी मुजम्माच्या शिक्षण आणि जेवणखाण्याची जबाबदारी उचलली. परिस्थितीशी झगडत मुजम्माने जिद्दीने नुकतेच बीएएमएस शिक्षण पूर्ण केले. ती केवळ उत्तीर्ण झाली नाही तर रँकही मिळविला. याबद्दल बेळगावच्या स्वयंसेवी संस्थांकडून तिचा सत्कार करून तिला गौरविण्यात आले. या घटनेवरून समाजात अद्याप माणुसकी जिवंत आहे हेच सिद्ध होते.
आपल्या सत्काराला उत्तर देताना भावुक झालेली मुजम्मा म्हणाली, गरिबीमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडण्याची वेळ माझ्यावर आली होती. मात्र स्वयंसेवी संस्थांनी आणि समाजसेवकांनी केलेल्या मदतीमुळे मी माझे शिक्षण पूर्ण करू शकले. याबद्दल मी त्यांचे सदैव आभारी राहीन.
सत्कार समारंभाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते फैजुल्ला माडीवाले, जमीर हांचिमणी, अफजल घिवाले, साजिद सय्यद, जुबेर मुतवल्ली, आझाद मुल्ला, सलीम माडीवाले युनूस काकती आदी व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचप्रमाणे अलइक्रा ट्रस्ट, बागवान ट्रस्ट, अल्फला ट्रस्ट, बालवी ट्रस्टचे पदाधिकारी, सदस्य तसेच हितचिंतक आणि शिक्षण प्रेमींनी समारंभास हजेरी लावली होती.