लाॅक डाऊन काळात बांधकाम कामगारांसाठी देण्यात आलेल्या जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वितरण करण्याऐवजी त्यांचा बेकायदेशीर साठा करण्यात आल्याचा प्रकार बेळगाव दक्षिण मतदार संघातील नव्याने निवडून आलेल्या एका पालिका सदस्याच्या मालकीच्या घरात उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आवाज उठवून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शहापूर पोलिसांकडे केली आहे.
लॉकडाऊन काळात बांधकाम कामगारांचे पोटापाण्याचे हाल होऊ नयेत यासाठी जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वाटप करण्यात आले होते. मात्र मोठ्या प्रमाणात असलेला सदर जीवनावश्यक किट्सचे लाभार्थीमध्ये वितरण करण्याऐवजी त्याचा घरांमध्ये साठा करून ठेवण्याचा प्रकार बेळगाव दक्षिण मतदारसंघात उघडकीस आला आहे.
शहापूर भागातील नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या एका भाजप उमेदवाराच्या मालकीच्या घरांमध्ये जीवनावश्यक साहित्याच्या किट्स हा बेकायदेशीरसाठा आढळून आला आहे. या प्रकारा विरुद्ध काँग्रेसने जोरदार आवाज उठविला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जीवनावश्यक साहित्याच्या बेकायदेशीर साठ्यासंदर्भात काल सायंकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्या नेतृत्वाखाली शहापूर पोलीस स्थानकासमोर आक्रमक पवित्रा घेऊन पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते विशेष करून युवानेते आर पी पाटील आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली.
जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचा बेकायदेशीर साठा करण्याच्या या प्रकाराला पोलिसांची फूस तर नाही ना? अशी शंका यावेळी उपस्थित करण्यात आली. त्याचप्रमाणे या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. शहापूर पोलिसांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.