श्री गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला असताना श्रीगणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला आज शहराच्या बाजारपेठेमधील रस्ते खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी फुलून गेले होते. कोरोनाचे सावट असतानाही बाप्पाच्या स्वागतात कोणतीही कसर राहू नये यासाठी भाविक धडपडताना दिसत होते.
श्री गणेशोत्सव हा बेळगावसह सीमाभागात सर्वात मोठा सण मानला जातो. श्री गणेशोत्सव उद्यावर येऊन ठेपल्यामुळे शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रविवार पेठ आदी रस्ते खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी फुलून गेले होते. गर्दीमुळे वाहनासह खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना काही ठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश प्रतिष्ठापनेसाठी पूजा साहित्याचे पॅकेज बॉक्स बाजारात उपलब्ध झाले आहेत.
या बॉक्समध्ये हळद -कुंकू, गुलाल, बुक्का, अष्टगंध, शेंदूर, कापूर, जानवे, उदबत्ती, अत्तर, 5 सुपारी, खारीक, बदाम, कापूस, वस्त्र, फुलवात, समई वात, रांगोळी, मध अशा वस्तू आहेत. श्री गणेशाची प्रतिष्ठापना करताना कोणत्याही वस्तूची कमतरता भासू नये हा यामागचा मूळ उद्देश आहे. या बॉक्सच्या खरेदीसह पूजेसाठी लागणारी विविध प्रकारची फळे, दूर्वा, विविध प्रकारची फुले, हारांच्या स्टाॅलवर आज दिवसभर ग्राहकांची वर्दळ दिसत होती.
श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठापनाच्या आदल्या दिवशी हरतालिकेचे पूजन केले जाते. आज गुरुवारी हरतालिकेचे पुजन असल्याने खरेदीसाठी बाजारात महिलांचीही गर्दी दिसून आली. हरतालिका पूजनासाठी विक्रेत्यांनी हरतालिकेच्या मूर्ती आणल्या आहेत हरतालिका पूजनाप्रसंगी वाळूची शंकराची पिंडी केली जाते हे लक्षात घेऊन हरतालिकेची मूर्ती, पत्री, वाळू आणि पूजासाहित्य असे एकत्र पॅकेजही दुकानदारांनी उपलब्ध केल्यामुळे महिलावर्गाची चांगली सोय झाली होती.
मागील वर्षापेक्षा यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत चैतन्य दिसत आहे. शहरातील बाजारपेठेत उपनगरासह खानापुर, चंदगड, आजरा, गोवा आदी ठिकाणचे ग्राहक सजावटीच्या साहित्यासह अन्य खरेदीसाठी येत असतात. यंदा लोकांचा कल पर्यावरणपूरक सजावटीकडे जास्त दिसून येत होता. विविध प्रकारचे पर्यावरण पूरक मखर बाजारात उपलब्ध आहेत. रंगबेरंगी कापडी फुलांच्या माळा, धूप कापूर, जाणवे, सुगंधी अगरबत्ती, अत्तर, विविध प्रकारचे मुकुट वगैरेंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी होताना पहावयास मिळत आहे.