आंबेवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील मण्णूर, आंबेवाडी, गोजग्यासह हिंडलगा परिसरातील घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मार्कंडेय नदीकाठावरील बंधारा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
येथील आंबेवाडी मण्णूर क्रॉसवरील मार्कंडेय नदीच्या बंधारा परिसरात दरवर्षी परिसरातील नागरिकांच्या घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. याशिवाय पाच दिवसांचे गणपती विसर्जन करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी भाविकांची नदी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी काही भाविकांनी निर्माल्य व प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात बंधारा परिसरात टाकल्याने अस्वच्छता निर्माण होऊन संपूर्ण परिसर गलिच्छ बनला होता. याबाबत नागरिकांनी सूचना केल्याने ग्रा.पं. अध्यक्ष चेतन पाटील व सदस्यांनी त्वरित पाहणी करून बंधाऱ्याच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविले. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडेझुडूपे तोडून रस्ता खुला करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण परिसर स्वच्छ बनल्याने नागरिक व भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.
(विसर्जनासाठी दिव्यांची व्यवस्था)
*अकराव्या दिवशी घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मार्कंडेय नदीच्या बंधाऱ्यावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू राहणार असल्याने अंधारात भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने दिव्यांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती ग्रा.पं. अध्यक्ष चेतन पाटील यांनी दिली.*
यावेळी ग्रा. पं. अध्यक्षांसह सदस्य नारायण लोहार, जोतिबा शहापूरकर, नागेश चौगुले, विक्रम यळकर, जोतिबा न्हावी, मारुती तरळे, सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.