कोणत्याही पक्षाचे तिकीट न घेता अपक्ष म्हणून उभे राहून सामाजिक कामाच्या जोरावर निवडून आलेल्या आणि आजच बेळगावचे नगरसेवक बनलेल्या शंकर पाटील यांनी पहिल्याच दिवशी एक चांगला आदर्श घालून दिला आहे.
निवडून आल्यानंतर कार्यकर्ते उत्साहात होते .संपूर्ण शहरातून कार्यकर्ते जमले आणि त्यांनी विजयोत्सव करण्यास सुरुवात केली. यामुळे शंकर पाटीलसुद्धा या उत्सवात सहभागी झाले होते. मात्र अचानक एका व्यक्तीचा फोन आला ,अतिशय गरीब माणसाचा मृत्यू झाला असून त्याच्या पुढेमागे कोणी नाही , परिस्थिती बिकट आहे. अंत्यविधी साठी मदतीची गरज आहे .असे कळताच शंकर पाटील यांनी आपला विजयोत्सव बाजूला ठेवला आणि वीजयोत्सवासाठी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन ते सदाशिवनगर स्मशानात दाखल झाले.
आनंदाच्या दिवशी दुर्लक्ष करून त्यांना बाजूला राहता आले असते, मात्र असे न करता एका गरीबाला त्याच्या शेवटच्या प्रवासासाठी मदत करण्याचा विडा त्यानी उचलला आणि सदाशिवनगर स्मशानभूमीत आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत त्यांनी अंत्यविधी केले .
त्यासंदर्भात बेळगाव live शी बोलताना त्यांनी माहिती दिली. अतिशय गरीब कुटुंबातील एक व्यक्ती दगावली .यामुळे समस्या निर्माण झाली होती. त्यांना मदत करणे हे आपले परम कर्तव्य होते आणि याच कामामुळे मला नागरिकांनी नगरसेवक केले आहे .
नगरसेवक झालेल्या दिवशीच जर असे काम मी विसरलो तर निवडून दिलेल्या नागरिकांचा तो अपमान ठरेल .त्यामुळे मी आज विजयोत्सव बाजूला ठेवून अंत्यविधी करत आहे .या पुढील काळातही सामाजिक कामे करतच राहणार आहे. असे त्यांनी सांगितले.
शंकर पाटील यांनी कोरोना च्या काळात चांगले काम केले. ॲम्बुलन्स फ्ल्यू क्लिनिक व अनेक उपक्रम राबवून त्यांनी नागरिकांना मदत केली. ज्यांना आधार मिळत नाही त्यांना आधार देण्याचे काम केले.
कोरोना ग्रस्तांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून योग्य उपचार मिळवून देण्याची व्यवस्था केली. अशा वेळी या उमेदवाराला निवडून देण्याचा वसा नागरिकांनी उचलला आणि त्यांना निवडून देण्यात आले. निवडून आल्यानंतरही आपले कर्तव्य आणि सेवाभावी तत्व त्यांनी कायम राखले आहे.