गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार असून त्यासाठी भाजप हायकमांडने हिरवा कंदील दाखवल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
अश्लिल सीडी प्रकरणामुळे आपले मंत्रिपद गमावून बसलेले गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांना राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान दिले जाणार आहे. जारकीहोळी यांना मंत्रिपद बहाल करण्यास भाजप हायकमांडने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे राज्याचे अधिवेशन समाप्त होताच रमेश जारकीहोळी पुन्हा ‘मिनिस्टर’ बनणार आहेत. यापद्धतीने अलीकडेच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या दिल्ली दौऱ्याला यश आले आहे.
कर्नाटक राज्य मंत्रिमंडळात 4 नव्या मंत्र्यांची भर घालून मंत्रिमंडळ विस्तारास हायकमांडने संमती दिली आहे. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळात रमेश जारकीहोळी यांना स्थान द्यावे, असे सूचित करताना उर्वरित तीन मंत्रिपदे कोणाला द्यायची याचा निर्णय मुख्यमंत्री बोम्मई यांनी घ्यावा, असे हायकमांडने स्पष्ट केल्याचे समजते.
अश्लील सीडीप्रकरणी मंत्री पदाचा राजीनामा देणाऱ्या आमदार रमेश जारकीहोळी यांना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात स्थान दिले जावे अशी जोरदार मागणी केली जात होती. जारकिहोळी यांच्या समर्थकांनी त्यासाठी रान उठविले होते. मात्र नूतन मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळू शकले नाही. त्यामुळे रमेश जारकीहोळी प्रचंड नाराज झाले होते. त्यांच्या नाराजीची पडसाद राजकीय पटलावर उमटण्याची शक्यता वर्तविली जात होती.
सीडी प्रकरणामुळे रमेश जारकीहोळी यांची प्रतिमा वादग्रस्त झाली असली तरी कर्नाटकात भारतीय जनता पक्षाला सत्तेवर आणण्यात रमेश जारकीहोळी यांचा सिंहाचा वाटा आहे हे लक्षात घेऊन त्यांना मंत्रिपद देणे उचित ठरेल अशी विनंती मुख्यमंत्री बोम्मई यांनी हाय कमांडकडे केली होती. ही विनंती मान्य करून अधिवेशन समाप्त होताच रमेश जारकीहोळी यांना मंत्रिपद घोषित करा, असे हायकमांडने सांगितल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.