कर्नाटक शिक्षण खात्याने कन्नड व इंग्रजी माध्यमांप्रमाणे आता मराठी माध्यमांच्या आठवी ते दहावी पर्यंतच्या पुस्तकांमध्ये प्रत्येक पाठावर ‘क्यू आर कोड’ उपलब्ध करून दिला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रत्येक पाठाचा अभ्यास करताना संबंधित पाठाचा व्हिडिओ पाहता येणार आहे.
कर्नाटक शिक्षण खात्याने यापूर्वी कन्नड व इंग्रजी माध्यमांमध्ये क्यू आर कोडचा प्रयोग केला असून तो यशस्वी झाल्याने यंदापासून मराठी माध्यमातून तो राबविला जात आहे. मराठी माध्यमाची आठवी ते दहावीची जी नवी पाठ्यपुस्तके आली आहेत, त्या पाठ्यपुस्तकांच्या प्रत्येक पाठावर हा ‘क्यूआर कोड’ आहे. सहावी व सातवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये मात्र अद्याप हा प्रयोग राबविला नाही. क्यू आर कोडमुळे विद्यार्थ्यांना आता प्रत्येक पाठाचा अभ्यास करताना संबंधित पाठाचा व्हिडिओ पाहता येणार आहे. दृकश्राव्य साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवले तर त्याची परिणामकारकता जास्त असते. त्यासाठी कांही शाळांमध्ये प्रोजेक्टरचा वापर केला जात आहे. तथापी आता स्मार्टफोनच्या माध्यमातून संबंधित पाठाचा थेट व्हिडिओच पाहता येणार आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे शिक्षण खात्याकडून मराठी माध्यमांच्या नव्या पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. ज्या शाळांमध्ये नव्या पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झाला आहे, तेथील विद्यार्थ्यांना या नव्या अभिनव संकल्पनेची अनुभूती घेता येणार आहे.
विद्यार्थी आपल्या घरी अभ्यास करताना पाठाचे वाचन करताना त्याचा व्हिडिओ पाहू शकतील. शाळेत शिक्षक ज्यावेळी तो पाठ शिकवतील त्यावेळी त्यांनाही या पाठाचा व्हिडिओ मोबाईल संगणक आणि प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखवता येईल. यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेवर देखील सकारात्मक परिणाम होईल असे शिक्षण खात्याला वाटते.