बेळगाव मार्गे पुणे ते बेंगलोर नवा हरित महामार्ग -प्रदूषण व रहदारी कमी करण्याबरोबरच पुण्यातील गर्दी कमी करून नवे पुणे विकसित करण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने फलटण -सातारा -बेळगाव मार्गे पुणे ते बेंगलोर नवा ग्रीन हायवे अर्थात हरित महामार्ग (प्रवेश नियंत्रित) बांधण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितिन गडकरी यांनी दिली.
या महामार्ग खेरीज पुणे-सातारा नव्या रस्त्याचे काम येत्या कांही महिन्यात पूर्ण होईल. हे प्रकल्प भारत सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग खाते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम खाते महाराष्ट्र यांच्याकडून संयुक्तरित्या राबविले जात आहेत.
या सर्वांकडून राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांमध्ये पुण्यातील एकूण 221 कि. मी. अंतराच्या 2,215 कोटी रुपये खर्चाच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा समावेश आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
पुण्यातील विकास कामांचा आढावा घेताना ते म्हणाले, सुरत -नाशिक -अहमदनगर -सोलापूर -अक्कलकोट -गुलबर्गा -यादगीर -कुर्नूल -चेन्नई हा 40,000 कोटी खर्चाचा हरित मार्ग बांधण्यात येत आहे.
त्यामुळे पुणे ते चेन्नई हे सध्याचे 1600 कि. मी.चे अंतर 1270 की. मी. इतके कमी होणार आहे. परिणामी प्रवास कालावधी 8 तासांनी कमी होणार असून रहदारी व प्रदूषणातही घट होणार आहे. या प्रकल्पासाठी पुणे-सातारा मार्गावरील टोलचा पैसा वापरला जाईल, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.