एकीकडे महापौर-उपमहापौर निवडणुकीची तयारी सुरू असताना बेळगाव महापालिका निवडणुकीत विरोधात उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाने बेळगाव महापालिकेसह अन्य प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी येत्या 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकी विरोधात प्रभाग क्र. 32 मधील एका पराभूत उमेदवाराने ही याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने नोटीस बजावल्यामुळे महापालिकेला आता या दाव्यामध्ये आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. बेळगाव महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत पराभूत झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीसह काँग्रेस तसेच अन्य अपक्ष उमेदवारांना निवडणुकीचा निकाल मान्य नाही.
त्यामुळे मतमोजणी दिवशीच सर्वांनी निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभूत उमेदवारांनी देखील या निवडणुकीला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या कांही दिवसात याचिका दाखल केली जाणार आहे. मात्र त्याआधीच एका राष्ट्रीय पक्षाच्या पराभूत उमेदवाराने वरीलप्रमाणे याचिका दाखल केली आहे.
बेळगाव महापालिकेच्या नूतन नगरसेवकांची नुकतीच राजपत्रात नोंद झाल्यामुळे एकिकडे महापौर -उपमहापौर निवडणुकीची तयारी सुरू झाली असताना दुसरीकडे महापालिका निवडणुकीला आव्हान देणारी याचिका धारवाड खंडपीठात दाखल झाल्यामुळे महापौर-उपमहापौर निवडणूक होणार की नाही? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम मशीनचा वापर झाला. मात्र ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅट जोडण्यात आले नव्हते असा प्रमुख आक्षेप पराभूत उमेदवाराने घेतला आहे. धारवाड खंडपीठाने गुरुवारी महापालिकेला नोटीस बजावली आहे. तथापि सदर नोटीस अद्याप आपल्याला मिळाली नसल्याचे महापालिकेच्या कायदा विभागाकडून सांगण्यात आले आहे.