ऐन गणेशोत्सवात शहराच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था पाहणाऱ्या एल अँड टी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन दिले नसल्यामुळे त्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत असून त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आता एल अँड टी कंपनीकडे सोपविण्यात आली असून गेल्या दोन महिन्यापूर्वी शहर पाणीपुरवठा मंडळाचे कर्मचारी या कंपनीकडे वर्ग करण्यात आले आहेत. तथापि गणेशोत्सवात कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नसल्यामुळे सणासुदीच्या दिवसात त्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
श्री गणेशोत्सव साजरा करण्याच्या त्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. शहर पाणीपुरवठा मंडळाकडे हंगामी तत्त्वावर काम करणाऱ्या 354 कामगारांना एल अँड टी कंपनीकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे वेतन कंपनीकडून देण्यात येते. यापूर्वी पाणीपुरवठा मंडळांकडून कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या तारखेला त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होते.
मागील महिन्यात एल अँड टी कंपनीने देखील वेळेवर वेतन दिले होते. मात्र सध्या गणेशोत्सव असताना वेतन देण्यात आलेले नाही. सणासुदीच्या दिवसात खिशावर आर्थिक खर्चाचा बोजा वाढत असतो अशा परिस्थितीत वेतन मिळाले नसल्यामुळे पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.