कोरोना परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मागील आठवड्यात रात्रीचा कर्फ्यू आणखी शिथील करताना तो रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत असेल असे जाहीर केले आहे. तथापि बेळगाव पोलीस मात्र रात्री 8 -8:15 वाजताच शहरातील व्यवहार बंद करण्यास भाग पाडत असल्याने मुख्यमंत्र्यांची घोषणा त्यांच्यापर्यंत पोहोचली की नाही? असा संतप्त सवाल नागरिक व व्यापाऱ्यांकडून केला जात आहे.
विकेंड लॉक डाऊन मागे घेतला तरी कोरोनाची संकट कायम असल्याने राज्यात अद्यापही नाईट कर्फ्यू लागू आहे. यापूर्वी रात्री नऊनंतर पहाटे 5 वाजेपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा नाईट कर्फ्यूचा आदेश लागू करण्यात आला होता. तथापि अलीकडे कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता कमी झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात राज्यातील नाईट कर्फ्यू आणखी शिथील करताना तो रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत करण्यात आला असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे नागरिकांसह दुकानदार आणि व्यापाऱ्यांमध्ये समाधान पसरले होते.
मुख्यमंत्र्यांनी नाईट कर्फ्यू रात्री दहानंतर लागू असल्याचे जाहीर केल्यानंतर त्याची खरेतर व्यवस्थित अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तथापि या आदेशाचे उल्लंघन बेळगाव पोलिसांकडून होत असताना दिसत आहे. कारण शहरात रात्री 8 -8:15 वाजताच पोलीस शिट्टी आणि सायरन वाजवत व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे व्यापारीवर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत असून मुख्यमंत्र्यांची घोषणा बेळगाव पोलिसांच्या कानापर्यंत अद्याप पोचली की नाही? असा संतप्त सवाल केला जात आहे.
तसेच पोलिसांच्या या मनमानीचा तीव्र निषेध केला जात आहे. पोलिसांकडून एकीकडे हा प्रकार केला जात असताना दुसरीकडे शहर आणि तालुक्यातील नामांकित हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवली जात आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, तर लहानसहान हॉटेल चालक, दुकानदार आणि व्यापाऱ्यांवर दादागिरी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.