लॉक डाऊनमुळे शाळेची ओढ कमी झालेल्या एका विद्यार्थ्याने आई वडिलांनी शाळेला जा म्हणून सांगितले त्यामुळे नाराज होऊन रागाच्या भरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सांबरा (ता. बेळगाव) येथे घडली आहे.
आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नांव ओमकार विठ्ठल धर्माजी (वय 17 रा. सांबरा) असे आहे. कोरोना व लोक डाऊनमुळे कॉलेज बंद असल्याने आपल्या वडिलांच्या हाताखाली काम करत होता. गेल्या वर्ष दीड वर्ष काम करत असल्यामुळे त्याची शाळेची ओढ कमी झाली होती.
तथापि आई-वडिलांची ओमकार नाही किमान बारावी तरी उत्तीर्ण व्हावे अशी अपेक्षा होती. आता कॉलेज पुनश्च सुरू झाल्यानंतर त्यांनी कॉलेजला जा असे सांगितले त्यामुळे तो नाराज होऊन ओमकारने गेल्या रविवारी अनंत चतुर्दशी दिवशी रागाच्या भरात विष प्राशन केले.
ओमकारने विष प्राशन केल्याचे लक्षात येताच त्याला तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराचा फायदा न होता आज मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेची मारीहाळ पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.
कोरोना प्रादुर्भाव आणि लाॅक डाऊनमुळे वर्ष -दीड वर्ष शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली होती. या कालावधीत ग्रामीण भागातील इयत्ता नववी, दहावीचे अकरावी बहुतांश विद्यार्थी घरखर्चाला हातभार लागावा म्हणून गवंडीकाम, रंगकाम आदी कामे करू लागली होती.
कांही मुले आपल्या वडिलांच्या हाताखाली काम करत होती. या कालावधीत या मुलांच्या हाती पैसा खेळू लागल्याने त्यांची शाळेबद्दलची ओढ कमी झाली. यात भर म्हणून लाॅक डाऊन काळात ऑनलाइन शिक्षणामुळे सर्व मुलांच्या हातात मोबाईल फोन आले आणि मुले मोबाईलमध्ये हरवून गेली.
ही परिस्थिती पाहता ओमकार धर्मोजी याच्या आत्महत्येस लॉक डाऊनच कारणीभूत आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया सांबरा गावातील पंच व माजी जि. पं. सदस्य नागेश देसाई यांनी व्यक्त केली.