धडाकेबाज पोलिस अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले, मागील तीस वर्षात कर्नाटक पोलिस दलात वेगवेगळ्या पदांवर काम केलेले आणि सध्या ए डी जी पी म्हणजेच अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून रेल्वेच्या विभागात काम करणारे पोलिस अधिकारी भास्करराव यांनी गुरुवारी मुदतीपूर्वसेवानिवृत्तीसाठी (व्हीआरएस) अर्ज केला आहे.
त्यांनी हा अर्ज केल्यामुळे या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत.भास्करराव हे पोलीस सेवा सोडून राजकारणात जाणार असल्याची चर्चा होत आहे. बेंगलोर शहराचे पोलीस कमिशनर म्हणून त्यांनी काम केले आहे.पोलीस महासंचालक आणि आय जी पी प्रवीण सूद तसेच चीफ सेक्रेटरी पी रवी कुमार यांची भेट घेऊन त्यांनी आपल्याला लवकरात लवकर सेवेतून मुक्त करावे. अशी विनंती केली आहे .
मला मुदतपूर्व सेवानिवृत्ती घ्यायची आहे .काही वैयक्तिक कारणासाठी मी राजीनामा देत असून हा अर्ज स्वीकारण्यात यावा. असे त्यांनी आपल्या विनंती अर्जात लिहिल्याची माहिती मिळाली असून यासंदर्भात भास्कर राव यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
2024 मध्ये भास्कर राव हे पूर्णता निवृत्त होणार होते मात्र त्यापूर्वी तीन वर्षे आधी त्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे अधिकारी वर्गात तसेच पोलिस वर्तुळात चर्चा निर्माण होत आहेत. राव राजकारणात जाणार असून बसवनगुडी मतदारसंघातून काँग्रेस किंवा आम आदमी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत .अशी चर्चा ही जोरात सुरू आहे .
अर्थशास्त्रविषयातून पदवी घेतलेले भास्कर राव 1990 बॅचचे आयपीएस ऑफिसर आहेत. सध्याचे बेंगलोर चे पोलीस आयुक्त कमल पंथ यांचे ते बॅचमेट आहेत. कोरोना काळात तसेच इतर अनेक वेळा त्यानी केलेल्या सेवा लोकांच्या स्मरणात राहिल्या आहेत. बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी आणि बेळगाव शहराचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून त्यांनीच पदभार स्वीकारला होता. यामुळे बेळगावकरांच्यासाठी ते नेहमीच आठवणीत राहणार आहेत.
कोरोना काळात त्यांनी हाताळलेल्या परिस्थिती संदर्भात राज्यभरात त्यांचे कौतुक झाले होते. अशा अधिकाऱ्याने मुदतीपूर्व राजीनामा दिल्यामुळे चर्चा जोरात सुरू आहे.