पोलिस खात्याकडून सध्या रखडलेल्या गुन्हे प्रकरणांचा तपास करण्यासह शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यास प्राधान्य देण्यात येत असून प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक समस्या कायमची दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
शहर आणि उपनगरांची व्याप्ती दिवसेंदिवस झपाट्याने वाढण्याबरोबरच वाहनांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. परिणामी शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर बनत चालली आहे. वाहनांच्या तुलनेत शहरातील रस्ते कमी असल्याने पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने वाहने पार्क करावी तरी कुठे? असा प्रश्न वाहनचालकांना समोर पडलेला असतो. कांही रस्ते प्रशस्त नसल्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रकार घडत असतात. यातभर म्हणून बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असते.
याची पोलीस खात्याने गांभीर्याने दखल घेतली आहे. आता बेशिस्त पार्किंग करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी यावर पोलीस खात्याकडून लक्ष केंद्रित केले जात आहे.
वाहतूक उत्तर-दक्षिण पोलीस स्थानकातील मनुष्यबळ कमी आहे. पोलिसांची संख्या अपुरी असली तरी शहरातील वाहतूक नियमन केले जात आहे. त्यामुळे पोलिस बळ वाढविण्यासह पूर्व आणि पश्चिम अशी आणखी दोन पोलीस ठाणी सुरू करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.