मला शरीरसौष्ठव क्षेत्रातच कारकीर्द घडवायची असून जागतिक स्तरावरील शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकून बेळगावसह देशाचे नांव उज्ज्वल करावयाचे हे माझे स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणारच, असा विश्वास श्री गणेश जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेची ओव्हरऑल चॅम्पियनशिप मिळविणाऱ्या तानाजी चौगुले याने व्यक्त केला आहे.
बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ झेंडा चौक यांच्या संयुक्त विद्यमाने काल मंगळवारी रात्री पार पडलेल्या श्री रत्नाकर शेट्टी स्मृति 17 व्या श्रीगणेश जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे सर्वंकष सर्वसाधारण अजिंक्यपद (ओव्हरऑल चॅम्पियनशिप) तानाजी बाळकृष्ण चौगुले याने हस्तगत केले आहे.
या पार्श्वभूमीवर बेळगाव लाईव्हशी बोलताना त्यांनी उपरोक्त विश्वास व्यक्त केला. तानाजी हा शहरातील राॅ फिटनेस जीम या जिम्नॅशियममध्ये व्यायामाचा सराव करण्याबरोबरच ट्रेनर अर्थात प्रशिक्षकाची भूमिका देखील पार पाडत असतो. दररोज सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत जिममध्ये व्यायामासाठी येणाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम केल्यानंतर तानाजी जवळपास एक तास स्वतः वर्काऊट अर्थात व्यायाम करतो.
त्यानंतर पी. बी. रोडवरील स्टार डिझेल येथे तो कामाला जातो. स्टार डिझेलमध्ये बॉश पंप रिपेरीचे काम करणारा तानाजी पुन्हा जिममध्ये येऊन सायंकाळी 7 पासून 8 वाजेपर्यंत वर्काऊट करतो. घोटीव पीळदार शरीरयष्टी बनविण्यासाठी प्रचंड मेहनत घेणाऱ्या तानाजीचा खुराक ही तसाच भक्कम आहे.
तानाजी याच्या खुराकामध्ये (डायट) दररोज दोन वेळा अर्धा -अर्धा किलो याप्रमाणे चिकन, 20 अंडी, ड्रायफ्रूट आदी गोष्टींचा समावेश असतो. यासाठी आपल्याला महिन्याकाठी 15 ते 20 हजार रुपये खर्च येत असल्याचे त्याने सांगितले. गेली दहा वर्षे शरीरसौष्ठव क्षेत्रात असलेल्या तानाजी याला त्याचे गुरू राॅ फिटनेस जीमचे मालक अजय चौगुले यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत असते.
महाद्वार रोड चौथा क्रॉस येथे राहणाऱ्या तानाजी चौगुले याने यापूर्वी तेलंगणा येथे 2016 साली झालेल्या ज्युनियर मिस्टर इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेतील 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले आहे. याच साली त्याने ‘हिंडलगा श्री’ हा किताब देखील हस्तगत केला. त्याचप्रमाणे 2017 सालच्या बेळगाव श्री स्पर्धेतील 65 किलो वजनी गटाचे विजेतेपद त्याने मिळवले होते. ‘संकेश्वर श्री’ टायटल पटकाविणारा तानाजी चौगुले हा 2016 -17 आणि 17 -18 या कालावधीत दोन वेळा ‘महापौर श्री’ किताबाचा मानकरी ठरला होता हे विशेष होय. याव्यतिरिक्त स्मार्ट बॉडी टायटल मिळविणाऱ्या तानाजी याने अनेक शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
लहानपणापासूनच आपल्याला व्यायामाची आवड असल्यामुळे घरच्या मंडळींकडून याबाबतीत आपल्याला संपूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळतो असे अलीकडेच विवाहबद्ध झालेल्या तानाजी चौगुले यांनी सांगितले. त्याप्रमाणे कठोर मेहनत घेऊन शरीरसौष्ठव क्षेत्रात आपल्याला याहून अधिक भरीव कामगिरी करावयाची आहे. यंदाच्या मिस्टर इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी मी जय्यत तयारी केली होती. तथापि कोरोना प्रादुर्भावामुळे स्पर्धेत भाग घेणे मला जमू शकले नाही. तथापि भविष्यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकून स्वतःसह माझे गाव बेळगाव आणि देशाचे नांव उज्वल करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे, असे श्री गणेश टायटल विजेत्या तानाजी चौगुले याने स्पष्ट केले.