lगरिबांना अत्यंत माफक दरात जेवायला मिळावे यासाठी सरकारने इंदिरा कॅन्टीन सुरू केले आहे. बेळगावातही अशी 6 कॅन्टीन असून त्यांच्यावर सरकारकडून दररोज 3 लाख 37 हजार 500 रुपये खर्च केले जातात. मात्र या इंदिरा कॅन्टीनमधील जेवणाचा दर्जा निकृष्ट असून यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याने त्याची तात्काळ सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
माहिती अधिकाराखाली के. विद्यासागर यांनी इंदिरा कॅन्टीन संदर्भातील माहिती मागवून त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे भ्रष्टाचाराची तक्रार केली आहे. शहरातील इंदिरा कॅन्टीनवर दररोज 3 लाख 37 हजार 500 रुपये खर्च केले जातात. मात्र या कॅन्टीनमधील जेवणाचा दर्जा अत्यंत सुमार असतो.
त्यामुळे उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असला पाहिजे. इंदिरा कॅन्टीनमधील जेवणाचा दर्जा लक्षात घेता खर्च अधिक येत आहे. तेंव्हा या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन सखोल चौकशी केली जावी, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
इंदिरा कॅन्टीन हे अनेकांचे आधार बनले आहे. या कॅन्टीनमध्ये अवघ्या 10 रुपयांमध्ये जेवण मिळत असल्याने अनेक गोरगरिबांची चांगली सोय झाली आहे. हे कॅन्टीन चालविण्यासाठी सरकार देखील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करत आहे.
फक्त बेळगाव शहरात दिवसाकाठी 3 लाखाहून अधिक रुपयांचा खर्च होत आहे. यावरून राज्यांमध्ये कोट्यावधी रुपये इंदिरा कॅन्टीन उपक्रमावर खर्च केले जात आहेत. मात्र या कॅन्टीनमध्ये असलेल्या जेवणाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्यामुळे त्याची कसून चौकशी केली जावी, अशी मागणी के. विद्यासागर यांनी केली आहे.