भाजपच्या एका आमदाराने प्रलोभनांमुळे आपली आई ख्रिश्चन बनली असल्याचे सांगितल्यानंतर गृहमंत्री अरग ज्ञानेन्द्र यांनी सरकार धर्मांतरण नियंत्रित करण्यासाठी कायदा करण्याचा विचार करत असल्याचे विधानसभेत स्पष्ट केले.
होसदुर्गाचे आमदार गोळिहट्टी शेखर यांनी शून्य तासात हा मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, राज्यात जबरदस्तीने धर्मांतराच्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत.
माझ्या आईचे एका ख्रिश्चनाने धर्मांतर केले आहे. कपाळावर सिंदूर न लावणे, मूर्तिपूजा सोडून देणे आदी गोष्टी ती करत आहे. तिचे ब्रेनवॉश केले गेले आहे. तिच्या फोनच्या रिंगटोनवरही ख्रिश्चन गाणे असल्यामुळे कुटुंबात बराच पेच निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले.
माझ्या मतदारसंघातील जवळपास 20 हजार लोक अशा प्रकारे ख्रिश्चन बनले आहेत. जादूटोणाविरोधी कायदा येण्यापूर्वी ग्रामीण भागातील हिंदू आजारावर उपचार शोधण्यासाठी स्थानिक देवतांकडे जात असत. ते आता थांबले असले तरी ख्रिश्चन मिशनरी उपचार आणि इतर फायदे देऊन धर्मांतरासाठी प्रलोभने दाखवतात, असा आरोप आमदार गोळिहट्टी यांनी केला.