अलतगा (ता. जि. बेळगाव) येथील सर्व्हे नं. 55 मधील दहा गुंठे जागेत कचरा डेपो सुरू केला जाऊ नये अशी जोरदार मागणी अलतगा देवस्थान पंचकमिटी आणि समस्त ग्रामस्थांनी केली असून तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
अलतगा देवस्थान पंचकमिटी आणि समस्त ग्रामस्थांनी आज सादर केलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्याने स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. अलतगा गावाच्या हद्दीतील सर्व्हे नं. 55 या जमिनीपैकी 10 गुंठे जमीन कचरा डेपोसाठी कब्जात घेण्याचा घाट सरकारने रचला आहे.
सदर जमिनीत कचरा डेपो करण्यास आमचा तीव्र विरोध आहे. कारण अलतगा गावासाठी थोडी व मोजकीच गायरान जमीन आहे. या जमिनीमुळे जनावरांच्या चाऱ्याची सोय होत असते. मात्र या ठिकाणी कचरा डेपो झाल्यास जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
पर्यायाने शेतकऱ्यांचा दुधाचा जोडधंदा संकटात येणार आहे. यासाठी संबंधित जमिनीत कचरा डेपोसाठी वापरण्यास अलतगा ग्रामस्थांचा विरोध आहे. तेंव्हा त्या जागेत कचरा डेपो सुरू करू नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी आर. आय. पाटील यांच्यासह अलतगा देवस्थान पंच कमिटीचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.