बेळगाव परिसरातील ग्रामीण भागात गणेश उत्सव काळात ओवशे हा कार्यक्रम आयोजित केला जातो.गणपती उत्सव हा उत्साहाचा सण आहे या सणात अनेक परंपरा जपल्या जातात गणेश उत्सवाच्या पाचव्या किंवा सातव्या दिवशी ओवशे केले जातात त्या विषयी थोडक्यात जाणून घेऊयात
गणेशोत्सव काळात ओवशे घालण्याचा धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार भक्तिभावाने पार पडला जातो. विशेष करून नवदाम्पत्याची गावातील मंडळींची ओळख होण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरत असतो. ओवशाची प्रथा सर्रास जिथे जिथे श्री गणेश पूजन केले जाते तिथे रूढ आहे.
चन्नेवाडी येथे वर्षभरातील नवविवाहित दांपत्य गावातील श्री गणेश पूजन व गौरीपूजन झाल्यानंतर किंवा पाच दिवसानंतर श्रीगणेशा समोर नैवेद्य ठेवतात. त्यामध्ये काकडी, पातोळे (हळदीच्या पानात जाड भाकरी सारखा उकडलेला पदार्थ), उकडलेले हरभरे, खोबरं, सुपारी,पानं व चिरमुरे असा या नैवेद्याचा समावेश असतो.
हा प्रसाद हळदीच्या पानातूनच ठेवला जातो हे विशेष होय. हा नैवेद्य घेऊन नवदांपत्य गावातील घरोघरी असलेल्या गणपती समोर ठेवून श्री गणेशाचे व त्या घरातील ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेतात. यातून नवदाम्पत्याची गावातील मंडळीशीओळख व्हावी हा एक उद्देश असू शकतो.
गावभर फिरून सर्वांची ओळख व आशीर्वाद घेणे यालाच ओवासने असे संबोधले जाते. यामध्ये सुवासिनीही उत्स्फूर्तपणे सहभागी असतात. श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर ज्येष्ठ नक्षत्रावर पाच, सहा, सात किंवा नऊ दिवस हा ओवशे कार्यक्रम केला जातो. ही प्रथा सर्रास जिथे जिथे श्रीगणेश पूजन केले जाते तिथे तिथे रूढ आहे.