भरधाव खडीवाहू टिप्पर टोलनाक्याला धडकून पेटल्याने जळून खाक झाल्याची घटना गणेबैल (ता. खानापूर) येथे आज सकाळी घडली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातग्रस्त टिप्पर उत्तमकुमार बापशेट (रा. टिळकवाडी, बेळगाव) यांच्या मालकीचा आहे. सदर खडी भरलेला दहा चाकी टिप्पर घेऊन चालक भरधाव वेगाने रामनगरकडे निघाला असता आज सकाळी 11 च्या सुमारास गणेबैल येथील टोलनाक्याला टिप्परने धडक दिली.
ही धडक इतकी जोराची होती की डिझेल टाकी फुटून आगीचा भडका उडाला आणि क्षणार्धात संपूर्ण टिप्परने पेट घेतला. धडक बसताच प्रसंगावधान राखून चालकाने टिप्पर बाहेर उडी घेतल्यामुळे त्याचा जीव वाचला.
सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत टिप्पर जळून खाक झाला होता. खानापूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.