दहा दिवसांचा गणेशोत्सव आनंद व उत्साहाला उधाण आणणारा असतो. उत्सवासाठी धार्मिक पूजा विधींची रेलचेल असते. या सर्वांमध्ये फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे आज श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी शहरातील फुलांच्या होलसेल मार्केटमध्ये खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती. याला कारण गणेशोत्सवामुळे मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे फुल मार्केटमधील सर्व फुलांचे दर घसरले होते.
श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अशोकनगर येथील फुलांच्या होलसेल मार्केटमध्ये आज गुरुवारी सर्व फुलांचे दर घसरले होते. त्यामुळे फुले खरेदी करण्यासाठी होलसेल फुल मार्केट आवारात ग्राहकांची एकच गर्दी झाली होती. बेळगावातील फुलांच्या या मुख्य होलसेल मार्केटमध्ये बेळगाव परिसरासह गदग, यरगट्टी, जंगवाड आदी गावांसह थेट बेंगलोर येथून फुलांची आवक होत असते. होलसेल फुल मार्केटमध्ये आज गुरुवारी प्रामुख्याने गुलाबाच्या फुलांसह पिवळ्या, पांढऱ्या अशा तीन-चार प्रकारची शेवंतीची फुले, नारंगी व पिवळ्या रंगाची झेंडूची फुले, बेंगलोर येथून मेरीगोल्ड नांवाचे फुल, मोगरा या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असल्यामुळे मार्केटमधील फुलांचे दर घसरल्याची माहिती होलसेल फुल विक्रेते आफ्रिद यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना दिली.
आफ्रिद यांनी दिलेल्या माहितीनुसार आज होलसेल फुल मार्केटमध्ये गुलाबाचा दर 250 रुपये प्रति किलो इतका सर्वाधिक आहे. तसे पाहता बेंगलोरमध्ये गुलाबाचा दर आजच्या घडीला 350 रुपये प्रति किलो आहे.
मात्र आवक वाढल्यामुळे बेळगावातील दर घसरून 250 रुपये इतका झाला आहे. आवक वाढल्यामुळे शेवंतीच्या फुलांचा दर देखील घसरला असून तो फुलांच्या दर्जानुसार प्रती किलो 40, 50, 60 ते 80 रुपये असा होता. झेंडूच्या फुलांचा दर काल 80 ते 100 रुपये किलो इतका होता. मात्र आज तो 30, 40, 50 रुपयांपर्यंत घसरला होता.
होलसेल फुल मार्केट मधील दर घसरल्यामुळे आज आज सकाळी फुले खरेदी करण्यासाठी ग्राहकांची एकच गर्दी झाली होती. संपूर्ण मार्केट आवारात फुलांनी भरलेले क्रेट आणि पोती पहावयास मिळत होती. एक एका गावातून तब्बल 7 -8 गाड्या भरुन फुलांची आवक झाल्यामुळे मार्केटचे आवार फुलांचे क्रेट आणि पोत्यांनी भरून गेले होते.