संपूर्ण कर्नाटकात यावर्षी गणेशोत्सव फक्त पाच दिवसांचा साजरा करावा अशी सूचना कर्नाटक सरकारने केली आहे. याला बेळगाव आणि परिसरातून विरोध होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी गणेशोत्सव अकरा दिवसाचाच होईल असे आश्वासन दिले होते.
त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र आता कर्नाटकाचे गृहमंत्री अरग ज्ञानेन्द्र यांनी गणेशोत्सव पाच दिवसाचा करावा लागेल असे विधान केले आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये पुन्हा एकदा नाराजी पसरली आहे.
कोविड नियम आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही हा निर्णय घेतला आहे. सर्वात प्रथम जीव वाचवणे गरजेचे आहे. त्यानंतर आम्ही परंपरा आणि इतर सारे वाचवू शकतो. तिसरी लाट प्रामुख्याने समोर येत आहे. अशा वेळी केवळ पाच दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव करावा. असे आवाहन आपण नागरिकांना करत आहे. असे ज्ञानेन्द्र यांनी सांगितले
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत यंत्रणेचा गैरवापर झाला असल्याच्या तक्रारी होत आहेत.
अनेक उमेदवार ही तक्रार करत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि आप या मुद्यावर एकत्र आले आहेत. या संदर्भात बोलताना आपण जिंकले तर सर्व यंत्रणा चांगली नाहीतर बाद अशी विरोधकांची भूमिका असते. त्यामुळे निवडणूक योग्य प्रकारे झाली असून बेळगावच्या जनतेने भाजपला कौल दिला आहे.
इतकेच मला माहित आहे. यंत्रणा दोषयुक्त असल्यास त्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही. आम्ही जिंकलो इतकेच आपल्याला माहित आहे. असे विधान त्यांनी केले आहे.