मनपा निवडणुकीत बहुसंख्य नवे चेहरे बेळगाव महापालिका सभागृहात दिसणार असले तरी काही मोजक्या माजी नगरसेवकांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे माजी नगरसेवक रवी धोत्रे व मुजम्मिल डोणी तिसऱ्यांदा आणि अजीम पटवेगार दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले आहेत.
यापुढे बेळगाव महापालिका सभागृह केवळ हे तीन जुने चेहरे पहावयास मिळणार आहेत. या तीन माजी नगरसेवकांना वगळता उर्वरित 55 चेहरे सभागृहात नवीन असणार असून त्यांना आपले कर्तुत्व सिद्ध करावे लागणार आहे. रवी धोत्रे आणि मुझममिल डोणी हे दोघेही मनपात अनुभवी नगरसेवक असणार आहेत.
मनपा निवडणुकीत तीन वगळता 55 जण पहिल्यांदा मनपा सभागृहात पाऊल ठेवणार आहेत तर केवळ तीन नगरसेवक आपला जुना अनुभव घेऊन मनपात जातील.यावेळी बहुतांश नगरसेवक तरुण आहेत त्यामुळे मनपात युवा राज होणार आहे.
बेळगाव महापालिकेत सातत्याने निवडून येणाऱ्यांची संख्या यावेळी अत्यंत कमी झाली असून त्याऐवजी सर्वाधिक नवे चेहरे निवडून आले आहेत. महापालिकेवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले असते तरी हे यश त्यांना पक्ष चिन्हामुळे नव्हे तर मराठी भाषिक उमेदवारांमुळेच मिळाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत 22 मराठी आणि 14 मुस्लिम उमेदवार निवडून आले आहेत हे विशेष होय.
बेळगाव महापालिकेच्या यावेळच्या निवडणुकीप्रसंगी आरक्षणाबरोबरच अवैज्ञानिक प्रभाग पुनर्रचना याचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळाला आहे. या फायद्याबरोबरच लोकसभा निवडणूक तसेच अन्य राष्ट्रीय मुद्द्यांवर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक जनतेच्या मनोवृत्ती लाभ भाजपला मिळाला आहे. बेळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 35 उमेदवार विजयी झाले असते तरी त्यापैकी 15 उमेदवार मराठी भाषिक आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रवी साळुंके, बसवराज मोदगेकर, वैशाली भातकांडे, शिवाजी मंडोळकर हे उमेदवार विजयी झाले असले तरी मराठी ज्योती कडोलकर या काँग्रेसतर्फे विजयी झाल्या आहेत. या व्यतिरिक्त पूजा पाटील व शंकर पाटील या अपक्ष उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले आहे.
महापालिकेच्या यावेळच्या निवडणुकीत कांही दाम्पत्याने देखील आपले नशीब आजमावले. विनायक गुंजेटकर (प्रभाग 29) व सायली गुंजेटकर (प्रभाग 52), मीना वाझ (प्रभाग 3) व रायमन वाझ (प्रभाग 4), मधुश्री पुजारी (प्रभाग 56) व आप्पासाहेब पुजारी (प्रभाग 41) ही दांपत्ये या वेळच्या निवडणूक रिंगणात उतरले होती. परंतु या तीनही दाम्पत्यांना दुर्देवाने पराभव पत्करावा लागला.