बेळगाव महानगरपालिकेच्या 58 प्रभागांसाठी आज निवडणूक मतदान प्रक्रिया समाप्त झाली असली तरी कोण -कोण निवडून येणार? निवडणुकीचा निकाल काय लागणार? याची चर्चा आत्तापासूनच गल्लोगल्ली रंगू लागली आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीचे मतदान आज सायंकाळी शांततेत पार पडले आहे. मतदान समाप्त झाले असले तरी आता झालेल्या मतदानाबद्दल गल्लोगल्ली चर्चा सुरू झाली असून कोणता उमेदवार निश्चितपणे निवडून येणार याबाबत अंदाज वर्तविले जाऊ लागले आहेत. यापूर्वी भाषिकतेच्या आधारावर लढविल्या जाणाऱ्या बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीला यावेळी राजकीय पक्ष उतरल्याने पक्षीय लढतीचा रंग आला आहे. त्यामुळे या निवडणुकीवर आत्तापर्यंत कायम वर्चस्व राखणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला राजकीय पक्षांपैकी कोण जास्त टक्कर देणार याबाबतही तर्कवितर्क लढविले जात आहेत.
कांही अतिउत्साही मंडळींनी तर समितीसह काँग्रेस, भाजप यापैकी कोणाचा उमेदवार कोणत्या प्रभागात विजयी होणार याचे भविष्य वर्तविण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे यापुढे बेळगाव महापालिकेवर कोणाची सत्ता राहणार याचेही ठोकताळे बांधले जात आहेत.
दरम्यान, याआधी मार्च 2013 मध्ये महापालिकेची निवडणूक झाली होती. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे 32 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे 5 वर्षे बेळगाव महापालिकेत समितीची सत्ता होती. पुढे मार्च 2019 मध्ये सभागृहाचा कार्यकाळ संपला तेंव्हापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे या निवडणुकीनंतर म्हणजे तब्बल अडीच वर्षानंतर आता बेळगाव महानगरपालिकेत लोकनियुक्त सभागृह येणार आहे.
सोमवारी दि 3 रोजी बी के मॉडेल हायस्कूल मध्ये मतमोजणी होणार आहे सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार असून दुपारी 12 पर्यंत मनपा चित्र स्पष्ट होईल.