कोरोना प्रादुर्भावाची संभाव्य तिसरी लाट ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य खात्याकडून आत्तापासूनच पूर्वतयारी सुरू झाली आहे.
कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी बीम्स हाॅस्पीटलमध्ये बेड्सची व्यवस्था करताना मुलांसाठी स्वतंत्र विभाग करण्याची तयारी सुरू आहे. तालुकापातळीवर ही नियोजनाचे आदेश देण्यात आले आहेत. केरळ व महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव अद्यापही नियंत्रणाखाली आलेला नाही. यासाठीच कर्नाटक शासनाकडून कोरोना संदर्भातील निर्बंध पूर्णपणे न उठवता शिथिल करण्यात आले आहेत.
तथापि कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत आरोग्य खात्याच्या विभागीय पातळीवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातमध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या. आवश्यक उपचार व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.
येत्या ऑक्टोबरमध्ये सुरु होणारा कोरोनाचा प्रादुर्भाव नोव्हेंबरपर्यंत कायम असणार आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका मुलांना आहे. तेंव्हा त्यांना त्याची झळ पोहोचणार नाही अथवा पोहोचलीच तर बाधा झालेल्यांसाठी सक्षम वैद्यकीय व्यवस्था तयार ठेवावी असे आरोग्य विभागाकडून महापालिका, बीम्स हॉस्पीटल आणि तालुका आरोग्य केंद्रांना कळविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह कोरोना मार्गदर्शक सुची बाबतच्या जागृतीवर भर देण्याची सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.